काॅंग्रेसचा एक दिवस शेतकऱ्यांसोबत

काॅंग्रेसचा एक दिवस शेतकऱ्यांसोबत

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आज (23 फेब्रुवारी) मुंबईत पार पडली. या बैठकीत केंद्रातील काळे कृषी कायदे, कामगार कायदे व वाढती इंधनदरवाढ यासह राजकीय विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर चर्चा करुन घेतला जाईल, असं जाहीर करण्यात आले.

काँग्रेसच्या बैठकीत संघटना आणि सरकारच्या कामकाजाबाबतही चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ हा कार्यक्रम राबवण्याबाबतही चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी संकल्प अभियान राबवले जाणार आहे. त्यासाठी 6 महिन्यांचा कार्यक्रम अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिला आहे, अशी माहिती प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

नाना पटोले म्हणाले, “शेतकरी विरोधी कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासूनच तीव्र विरोध केलाय. हे कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेस पक्षाचा संघर्ष सुरुच राहणार आहे. केंद्रातील हे काळे कायदे महाराष्ट्रात लागू करू नयेत. शेतकरी हिताचा विचार करुन आवश्यक ते कायदे राज्यात आणू.”

COMMENTS