शिवसेना आमदाराच्या कट्टर राजकीय शत्रूला राष्ट्रवादी घेणार पक्षात,  शरद पवारांच्या उपस्थितीत आज करणार प्रवेश!

शिवसेना आमदाराच्या कट्टर राजकीय शत्रूला राष्ट्रवादी घेणार पक्षात, शरद पवारांच्या उपस्थितीत आज करणार प्रवेश!

सांगली – खानापूर आटपाडीचे माजी आमदार सदाशिव पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ज्येष्ठ नेते सदाशिव पाटील हे खानापूर आटपाडी मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यापूर्वी विटा नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष होते.

सदाशिव पाटील हे काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष होते. मात्र पाटील यांनी काँग्रेस पक्षाची फारकत घेऊन चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत खानापूर आटपाडी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

दरम्यान विद्यमान आमदार अनिल बाबर आणि माजी आमदार सदाशिव पाटील हे परंपरागत प्रतिस्पर्धी आहेत. सदाशिव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे खानापूर – आटपाडी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी यापूर्वी राष्ट्रवादीकडून 2004 आणि 2009 ला निवडणूक लढवली होती. यावेळी सदाशिव पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवून सलग दोन वेळा अनिल बाबर यांचा पराभव केला होता.

मात्र 2014 ला बाबर यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेस अनिल बाबर यांनी सदाशिव पाटील यांचा पराभव केला. अनिल बाबर हे शिवसेनेचे आमदार आहेत, मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बरोबर त्यांचे म्हणावे, तितक जमत नाही.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांची मिळून महाविकास आघाडी सत्तेवर आली आहे. अनेक जिल्ह्यात स्थानिक निवडणुकांमध्ये सुद्धा हे तिन्ही पक्ष एकत्र बघायला मिळत आहेत.

मात्र नुकत्याच झालेल्या सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार अनिल बाबर समर्थक शिवसेनेच्या सदस्यांनी भाजपला मतदान केल्यामुळे पुन्हा एकदा सांगली जिल्हा परिषदेत भाजपचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडून आले आहेत.

आमदार अनिल बाबर विरुद्ध माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यातील संघर्ष भविष्यात नव्या वळणावर पाहायला मिळू शकतो. शिवसेनेच्या मदतीने राष्ट्रवादी राज्यात सत्तेवर आली आहे. पण शिवसेनेच्या आमदाराच्या कट्टर राजकीय शत्रूला राष्ट्रवादी आपल्या पक्षात घेत आहे, यातून खानापूर आटपाडी तालुक्यातील राजकीय संघर्षातून होणाऱ्या भूकंपाचे धक्के मुंबईत मातोश्री पर्यंत जाणार आहेत.

COMMENTS