शरद पवारांवर गंभीर आरोप, भाजप आमदारानं लिहिलेलं पत्र जसेच्या तसं !

शरद पवारांवर गंभीर आरोप, भाजप आमदारानं लिहिलेलं पत्र जसेच्या तसं !

धुळे – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एका भाजप आमदारानं खुलं पत्र लिहिलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. पुण्यामध्ये राज ठाकरेंनी घेतलेल्या शरद पवारांच्या महामुलाखतीच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल गोटे यांनी हे पत्र लिहिले आहे. या पत्रात आमदार अनिल गोटे यांनी पवारांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

अनिल गोटेंनी लिहिलेलं पत्र जसेच्या तसं…..

 

श्रीमान  शरदचंद्र  गोविंद पवार,

महाराष्ट्राचे जाणते नेते, आपलाच पक्षाशी दोन वेळा फारकती घेवून नवा घरोबा करुन पुनश्च जुन्याच घराच्या आकर्षणापोटी शेजारच्याच घरात आडव्या भिंतीच्या आधाराने जीवन कंठण्याचे कौशल्य असलेले आंतरराष्ट्रीय पातळी वरील एक मुश्त नेते यांना लाख लाख सप्रेम नमस्कार,

नागपूरच्या मोर्चानंतर आपण फार लवकर पत्रोपत्री करण्याची सधी दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार ! आजच्या पत्राचे निमित्त जरा विशेष आहे .  काल पासून सर्वच प्रासार माध्यमांमधे मोदी संबधी आपले “निरव”विचारधन वाचनात आले . आपण तर, राष्ट्रपिता महात्मा गांधीना सत्याच्या प्रयोगात हरवून टाकले. जगातील सर्वच नेत्याच्या चरित्राचा अभ्यास करणारे पायलीचे पन्नास संशोधक कामी लागले. चरित्राचे संशोधन करण्यासाठी अनेक विद्वानांनी संपूर्ण जीवन खर्ची घातल. राष्ट्रपुरुषांच्या म्हणण्याचा अर्थ “असा” आहे! “तसा” आहे! जो तो ठासून हिरिरीने आपलेच म्हणणे खरे कसे? यावर तासंतास वितंडवाद घालण्यात जीवन खर्ची घातले. सांगायचा उद्देश असा की, महात्मा गांधीच्या जीवनाचा ना कुणाला अभ्यास करावा लागला , ना संशोधन ! स्वतःच आपले आरपार दर्शक चरित्र लिहून ठेवले . तर, आपल्या नव्या नव्या सत्य कथनामुळे मला तर, भरुनच आले. फिरोज गांधीनी आपल्या चरित्रात एक अप्रतिम वाक्य लिहीले आहे. “POLITICS IS A LAST STOP OF SCOUNDREL”

सर्वानाच कळावं म्हणून मोडक्या तोडक्या मराठीत “राजकारण हा बदमाषांचा शेवटचा मुक्काम आहे ” कालपासून मला फिरोज गांधींच्या वाक्याचा संताप आला. कारण आपल्यासारखी सज्जन, एकवचनी, निष्पाप जे बोलायचे ते केवळ सत्य आणि फक्त सत्यच! आपणासारखी अशी एक व्यक्ती भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीसारख्या तालुका पातळीवर जन्म घेवून सबंध देशाच्या राजकारणात असा ठसा उमटवेल की, कधी कुणाला उख्खाड  मारेल याचा भल्या भल्यांना अंदाज येणार नाही. याची कल्पना फिरोज गांधींना सुद्धा नसावी. असो!

आपण काल एक सूर्य प्रकाशाला लाजवेल अस सत्य उघड करुन देशाला हादरवून टाकले. “बँका बुडवून पळून गेलेले सर्व भाजपाचेच मित्र आहेत. जगातील अंतिम सत्यच आपण कुणाची भाडभीड न ठेवता मांडले.  एवढे धाडस ज्याचे हात अस्वच्छ नाहीत अशीच व्यक्ती मांडू शकते, एऱ्यागबाळ्याचे काम नव्हे!

राजकारणातील अन्य कुणालाही शक्य नाही. आज अत्रे साहेब असते तर, त्यांनी म्हटले असते “असा नरपुंग गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही ,पुढील दहा हजार वर्षात होणार नाही”. हिर्‍याची परीक्षा करायला खरा पारखीच लागतो. एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे!

आपल्या देशातून बँका बुडवून पळून गेलेल्या भाजपाच्या मित्रांचा एकेकाचा परिचय करून घेवू! मोदी नावाचा आपणाला पूर्वीपासूनच फार ओढा ! आपण राजकारणाबरोबर अनेक खेळ गाजविले. कुस्ती संघटनेचे पदाधिकारी होतात. समोरच्याला बेमालूमपणे उख्खाड कशी मारायची याचे सर्व डावपेच  अवगत होतेच, नंतर आपण कब्बड्डीच्या क्षेत्रात प्रवेशित झालात. बुवा साळवी वगैरे दिग्गजांकडून आपण कब्बड्डीची सेवा करवून घेतली. मैदानावर बेमालूमपणे आत घुसून एका फटक्यात पूर्णच्या पूर्ण टीम कशी गारद करायची याचे प्रत्यक्ष मैदानावरील ज्ञान आपल्या व्यतिरीक्त अन्य नेत्याला असू शकत नाही. याचा पहिला झटका कै. वसंतदादांसारख्या नेत्याला दिलात….. कधी पटात घुसून अख्खे गडी बाद केलेत याचा दादांसारख्या नेत्याला शेवटपर्यंत मागमूस सुद्धा लागू शकला नाही. यानंतर आपल्या शिरपेचात धुरंधर राजकारणी म्हणून जो तुरा खोचला तो अजूनही कायम आहे. अचानक आपण पॅड मॅन म्हणून क्रिकेटच्या मैदानावर कसे अवतरलात हे चमत्कारापेक्षा कमी नाही. ब्रिटिशांचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये आपण त्यांची कुठल्या गुगलीवर विकेट घेतली अजूनही त्यांना उमगले नसावे. आपला राजकारणातील वेग ध्वनीच्या वेगापेक्षा कैकपटीने जास्त आहेच ! याचा परिचय आपण  क्रिकेट क्षेत्रात प्रवेशीत होताच क्रिडा क्षेत्राला दाखवून दिलात. क्रिकेटवर अधिराज्य गाजवणार्‍या , आपल्या कुवतीनुसार क्रिकेटला अच्छे दिन आणून देणार्‍या डालमियांचे दिन फिरलेच पण त्यांची अवस्थाहि  दीन करुन टाकली . त्यांनाहि कळाल नाही ” क्या से क्या हो गया बेवफा तेरे झगडे मे ” आपण निस्पृह व टोकाचे धेय्यवादी प्रामाणिक असल्यामुळे डालमियाँनी प्रत्यक्ष विमानाच्या तिकीटाचा भ्रष्टाचार केल्याच्या महापातकासाठी तुरुंगाची हवाही खावी लागली . असो ! नंतर तर, आपणास आकाशच मोकळे झाले . अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही झालात . याच कालावधीत  आपणास ललीत मोदी नावाचा परीसच गवसला.

क्रिकेट मधल आपल्याला काही कळत नाही बुवा ! पाच दिवसाची टेस्ट मॅच असते एवढच ज्ञान ! नंतर क्रांतीकारी बदल घडवून आणले . पन्नास ओव्हर , मग ट्वेन्टी ट्वेन्टी  भविष्यात काय घडेल भरोसा नाय ! ललीत मोदींनी क्रिकेटला लक्ष्मी दर्शन घडवले. ललीत मोदींच्या रूपाने पैसे कमविण्याचे मशिनच हाती लागले, त्यांनी कमवले , इष्ट मित्रांना ही घडविले .

आम्ही काय खेड्यातून आलेलो. बुरसटलेले विचार आम्ही बालपणी बैल बाजार पाहिला , धनगर असल्याने शेळ्या मेंढ्या विकायला काकां बरोबर जात असे . विकणारा व  घेणार्‍यांच्या मधे एक  दलाल असे दोघेही धोतरात हात घालायचे मग मागे पुढे करुन सौदा व्हायचा ! जनावरांचा बाजार माहिती होता. ललित मोदींनी चमत्कारच घडवला खेळाडूंच्या माध्यमातून चक्क माणसांचा  लिलाव पाहून आश्चर्य वाटले…….

पूर्वी आफ्रिकन राष्ट्रामधे  अमेरीकेत गुलामांचा  बाजार भरत असे त्याविरुद् अब्राहम  लिंकन , मार्टीन ल्यूथर किंग यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली हौतात्म्य पत्करले . हे इतिहासात वाचले . पण इथे तर  स्वतःच स्वतःला  विकायचे !!!!!

खरेच आपल्या कल्पनेला  त्रिवार सलाम!!!

क्रिकेट बोर्ड श्रीमंत झाले . मैदानाच्या चौफेर  लावलेल्या जाहिरातींचे  अक्षरशः कोट्यावधी रुपये जमा होत असताना ललीत मोदी नावाच्या भामट्याला देश सोडून पळून  का जावे लागले ? आपणास आठवत असेलच आपण स्वतः मुंबई व दिल्ली मधे खात्रीपूर्वक सांगितले होते की, ” मला विश्वास आहे की, ललीत मोदी भारतात निश्चित पणे परत  येतील “  ललीत मोदी देश सोडून पळून  गेला तेंव्हा कुणाचे सरकार होते ? कोण होते सत्तेत  ?  आपण सुद्दा केंद्रीय मंत्री  मंडळात पहिल्या पाच सात मंत्र्यांमधे होतात . तेंव्हाही भाजपाचे होते का हे देशभक्त  चोर ? तेव्हा तर, मौनी बाबा मन मोहनसिंगाचे  पर्यायाने राहूल गांधींच्या माता देवी सोनीयाजीच्या  यु पी ए चे सरकार होते . मग का नाही आणला ललीत मोदीला ?चला आता आपण आपले दुसरे लाडके मित्र , ऐय्याशीत वरच्या क्रमांकावर असलेले , अंदाजे दहा बारा वर्षां पूर्वी केवळ बाराशे कोटी रुपयांच्या   बारामती वाईन  फॅक्टरीतील एक भागिदार , अत्यंत सालस स्त्रीदाक्षिण्याचे महामेरु , सौंदर्याचे उपासक , जगातील मद्यनिर्मितीत पहिल्या दोन पाच उत्पादकांपैकी एक महामहोपाध्याय , श्री.श्री. श्रीमंत विजय माल्या यांची आपली मैत्री तर , जगजाहीर होती .मित्र असावेत तर, असे ललीत मोदी विजय माल्या डि.बी . रियालीटीज वाले गोयंका , बलवाज  वगैरे आंराराष्ट्रीय पातळीवर आपल्या अनन्य साधारण सद्गुणांनी सर्वोच्च  शिखर गाठणारे !

त्यांचाहि एक ऐतिहासीक फोटो  सोबत जोडला आहे . स्वतः माल्या आपणा सर्वांच्या सेवेत आहेत .  सदर ऐतिहासिक प्रसंगाच्या छाया चित्रात  नरेंद्र मोदी , राजनाथ सिंग , देवेंद्र फडणवीस एकही भाजपाचा नेता  कुठे दिसत नाही . भाजपावाले हुश्शार आहेत फोटोत आपणास दिले लटकवून अन् स्वतः नामानिराळे बर झाल तुम्ही यांच पितळ उघड केल ? माल्या पळून जाणार आहे.याची  आपणास माहीती नसेल तर, जिवलग मित्राने गद्दारी केली असेच म्हणावे लागेल , “प्यार  प्यार  ना  रहा दोस्त दोस्त ना रहा” ! असेच  उद्गागार काढावे लागतील ! पण विजय माल्याला बँकांनी कर्ज पुरवठा केल्या कुणाच्या सरकारात . एका कर्ज प्रकरणात आपली शिफारस असल्याचे माझ्या वाचनात आले होते . जावू द्या दुर्लक्ष करा , आजच  राज ठाकरेंनी घेतलेल्या हसत्या खेळत्या मुलाखतीत सांगितलेच !  ज्या वृत्तपत्राचा हवाला अपण दिलात त्याचे कात्रण आजही माझ्याकडे आहे . त्या वृत्तपत्राच नाव आहे “जनसत्ता” स्वर्गीय रामनाथजीं  लोकसत्तेचे भावंड म्हणून चालवत असत . प्रसन्न  जोशी संपादक होते . दाऊदच्या भावाच नाव होत नूरा इब्राहीम त्याने मुलाखतीत “शरद पवार साहब को हम जानते है”, एवढच म्हटल नाही . “सरकार हमारे खिलाफ है” असे वाक्य वापरले नाही . मुलाखतीत नूरा अस म्हणाला ” पवार साहब तो हमारे दोस्त है।  हप्ते मे दो चार बार बाते होती है।” आपण म्हणाल तर, मी आपणास पाठवून देईन भविष्यात असा प्रश्न अन्य कुणी विचारला तर, खरे खरे आपणास सांगता यावे याच्या संर्दभासाठी ! उगाच तुमचा गैर समज झाला तर…… ? नको रे बाबा ! राज ठाकरे सारखे स्व. बाळासाहेबांचे पुतण्यांना आपली भिती वाटते , मग आम्हा पामराचे काय व्हावे ? असो !! असो !! तर विजय माल्याच्या चार पाचशे कोटी रुपयांच्या विमानाचा शुभारंभ फीत कापूकापून आपण करीत आहात . तत्कालीन विमान वहातूक मंत्री माजी राज्यपाल व तेलगीचे दुसरे लाभार्थी एस. एम कृष्णा बसलेले आहेत . तरी “विजय माल्या भाजपचा मित्र होता ” अस बिनधास्त वक्तव्य करतांना आपण लबाड बोलत आहोत . सगळेच भाजपावाले नरेंद्र मोदी अथवा देवेंद्र फडणवीस नाहीत की, राजकीय सभ्यता म्हणून आपल्या जेष्ठत्वाचा मान राखून खपवून घेतील . काही असेही आहेत की, “ज्या गावच्या  बोरी त्याच गावच्या नव्हे तर , त्याच शिवारातील लांब काट्याच्या जंगली बाभुळी “आहेत . कधी सांगता  “सरकारच  देण देवू नका ” कधी सांगता “हे जातीयवादी सरकार आहे” कधी म्हणता “महाराष्ट्रात पेशवाई आली आहे .” तर, “मराठे पेशव्यांची नेमणूक करीत होते ” “आज पेशवे नेमणूक करतात ” कोरेगाव भिमा प्रकरणात “मराठ्यानी व दलितांनी शांतता राखावी ” कधी काय ? कधी काय ? सताच्यूत झाल्याने आपण सैर भैर झालात का ? याचा एकदा ज़रुर  आत्मचिंतन करा ! अंतीम बात जे.जे. हत्याकांड  दाऊदने घडवून आणल . त्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी  भिवंडीचे नगराध्यक्ष आपलेच होते ना ? कै वसंतराव डावखरे मर्द माणूस सूर्यरावला पोलीस कस्टडीत भेटायला गेले.  न घाबरता ! म्हणाले हो माझा मित्र आहे ! कार्यकर्ता आहे ! आपण मात्र जे. जे. हत्याकांडातील आरोपी अनिल व सुनिल शर्मांना संरक्षण खात्याच्या विमानातून घेवून आलात.

कै. मुंडे साहेबांनी तुम्हाला आवाहन दिले . विधी मंडळाच अधिवेशन संपण्यापूर्वी नाव सांगा ! नाही तर, मी सांगतो .आपण अखेर पर्यंत आवाक्षर काढले  नाही , अशा अनेक घटना आहेत ज्या मुळे तुमचे नाव दाऊद सारख्या  देशद्रोह्याशी वारंवार  जोडले गेले . संघाचा स्वयंसेवक म्हणून व पक्षाचा आमदार या नात्याने विनंती की, राजकारणाचा भाग म्हणून आपण  ध्येय धोरणावर कडाडून टीका करा ! पण आपण आमच्या नेत्यांचे चारित्र्य हनन करु नका ! आज एक अनिल गोटे भाडभिड न बाळगता सुनावतो .महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यात असे शेकडो अनिल गोटे गोटमार करतील . काळ सोकावला की, भल्यांना हात टेकावे लागतात .

एकच ओळ लक्षात असू द्या

तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही।

तुम किसी और से  निभाओगे तो मुश्कील  होगी”

अनिल गोटे

सलग तीन वेळेस राष्ट्रवादीला पटकी देवून निवडून आलेला आमदार

 

COMMENTS