विरोधी पक्षाचा शेतकरी प्रश्नावर स्थगन प्रस्ताव, शेतक-यांची ऐतिहासिक फसवणूक – विखे पाटील

विरोधी पक्षाचा शेतकरी प्रश्नावर स्थगन प्रस्ताव, शेतक-यांची ऐतिहासिक फसवणूक – विखे पाटील

नागपूर- कर्जमाफीच्या नावाखाली राज्यातील शेतक-यांची ऐतिहासिक फसवणूक सरकारनं केली असल्याची जोरदार टीका विरोधकांनी आज विधानसभेत केली आहे. याबाबत विरोधी पक्षानं स्थगन प्रस्ताव आणला आहे. राज्य सरकारनं ऐतिहासिक कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषित केली. परंतु शेतक-यांना कर्जमाफी मिळाली नसल्यामुळे शिवाजी महाराजांच्या नावाखाली शेतक-यांची फसवणूक केली असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.

दरम्यान आज महाराज असते तर तुमचा कडेलोट केला असता. महाराज ह्यात नाहीत. त्यामुळे 2019 मध्ये शिवप्रेमी तुमचा कडेलोट करतील असा इशाराही यावेळी विखे-पाटील यांनी दिला आहे. तसेच 18 ओक्टोबर रोजी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्र दिली. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील सुभाष राठोड आणि मधुकर राठोड यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळालं मात्र अजून कर्जमाफीची रक्कम मिळाली नाही. तसेच 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होता, पण आजपर्यंत फक्त 37 लाख शेतकऱ्यांना 15 हजार कोटींचं कर्जवाटप केलं आहे.

दरम्यान शिवसेनेनं तर घोषणा केली होती कर्जमाफी दिलेल्या प्रत्येक शेतक-याचे नावं सरकारकडे मागणार, यावर मंत्री राजीनामा द्यायला तयार होते. पण पावसाच्या पाण्यात शिवसेना मंत्र्यांचे राजीनामा वाहून गेले असल्याची टीकाही यावेळी विरोधकांनी केली आहे. शिवसेनेनं २१२ वेळा सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी दिली, २१३ व्या वेळी पुन्हा घोषणा करा सत्तेतून बाहेर पडणार म्हणून. आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम होता. आता आमची माणसं आमचीच माती करतील हा नवीन कार्यक्रम सरकारने सुरू करावा असा टोलाही यावेळी विखे-पाटील यांनी लगावला आहे.

तसेच बँक ऑफ महाराष्ट्र सीईओवर कारवाई केली मग कोणती बँक तुम्हाला मदत करायला पुढे येईल. बँकेचे अधिकारी मस्तवाल शेतकऱ्यांची बायको मागतात, याआधी असं धाडस कोणी केलं नाही. भाकड जनावरांसाठी गो ग्राम काढण्याची घोषणा सरकारने केली होती. किती गो ग्राम या सरकारने काढले असा सवालही यावेळी विखे-पाटील यांनी केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हितासाठी आम्ही हा कायदा शिथिल करण्याची मागणी केली होती परंतु सरकारने तसे केले नाही, त्याचा त्रास शेतकऱ्यांना होत असल्याचंही यावेळी विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS