अधिवेशनाचा कालावधी वाढवा, विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट !

अधिवेशनाचा कालावधी वाढवा, विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट !

मुंबई – हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस चांगलाच गाजला आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे.यासाठी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज राजभवन, मुंबई येथे राज्यपालांची भेट घेतली. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी हा कालावधी पुरेसा नाही, अधिवेशनाचा कालावधी वाढवला पाहिजे अशी विनंती राज्यपालांना यावेळी करण्यात आली आहे. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह विरोधी पक्षातील इतर नेते उपस्थित होते.

दरम्यान कायम टंचाईग्रस्त असणाऱ्या खटाव तालुक्याला राज्यशासनाच्या दुष्काळी यादीतून वगळण्यात आल्याने तालुक्याचे तीनही लोकप्रतिनिधी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक झाले होते. विधीमंडळाच्या प्रवेशद्वारावर आ. बाळासाहेब पाटील,आ. जयकुमार गोरे यांच्यासमवेत मिळून धरणे आंदोलन केले आहे.

तसेच दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसून शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्या या मागणीसाठी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळाच्या पाय-यांवर विरोधकांनी आंदोलन केले. त्यामुळे अधिवेशनाचा पहिलाच दिवस चांगलाच गाजला आहे.

COMMENTS