विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम नको बॅलेट पेपरच आणा, विरोधकांची एकमुखाने मागणी !

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम नको बॅलेट पेपरच आणा, विरोधकांची एकमुखाने मागणी !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम नको बॅलेट पेपरच आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे. याबाबत आज सर्व विरोधी पक्षांनी मुंबईत एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षातर्फे राज ठाकरे, छगन भुजबळ, अजित पवार, राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, शिक्षकभारतीचे कपिल पाटील उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर स्वयंसेवी संस्थांसह अनेकांनी प्रगत देशात ईव्हीएम वापरले जात नसल्याकडे लक्ष वेधले होते. मात्र निवडणूक आयोगाने ती मागणी मान्य केली नाही. आगामी विधानसभा निवडणूक ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे घ्यावे अशी आमच्यासह अनेकांची मागणी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.
तसेच जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो की जनतेने या मागणीसाठी पुढे यावे. ही राजकीय पक्षाची मागणी म्हणून नव्हे तर जनतेची मागणी म्हणून पुढे यावे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सगळ्यांना धक्का बसला आहे. लोकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे, निवडणुकीेचे निकाल असे कसे लागले. जिथे पारदर्शकता हवी तिथे ती नाही. यापुढे यावर आंदोलन असेल त्यात कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल. एक फॉर्म राज्यातील लोकांना वितरित केला जाणार आहे. ईव्हीएम नको तर मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे अशा आशयाचा हा फॉर्म असणार आहे, तो लोकांकडून भरून घेतला जाणार आहे. हे फॉर्म जमा करून निवडणूक आयोगाला दिले जाणर असून 21 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. हा पहिला टप्पा असेल पुढचा टप्पा नंतर सांगितला जाईल असं थोरात यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अमेरिकेसारख्या देशात ईव्हीएमद्वारे नव्हे तर मतपत्रिकेद्वारे मतदान होते. असं राष्ट्रवादूचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान म्हणतात सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास. आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही, तो मिळवायचा असेल तर मतपत्रिकेद्वारे मतदान घ्या.50 टक्के जनतेचा या प्रक्रियेवर विश्वास नाही. जिथे हे तंत्रज्ञान तयार झाले ते देश हे तंत्रज्ञान वापरत नाहीत. असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

तसेच स्वाभिमानी शेतकी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीहू 15 ऑगस्टला ग्रामसभा होतात, गावा गावात ग्रामसभांनी ईव्हीएम नको असेल तर तसे ठरवा करावे. स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने मतदान व्हावे हा जनतेचा अधिकार आहे. 21 तारखेचा मोर्चा कुठल्याही पक्षाचा नसेल तर सर्वसामान्य जनतेचा असेल. यात जनतेने सामिल व्हावे आणि दाखवून द्यावे ही जनतेची मागणी असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेला भाकपा, आम आदमी पार्टी, जनता दल सेक्युलर या पक्षाचे प्रतिनिधीही पत्रकार परिषदेतला उपस्थित होते.

COMMENTS