उस्मानाबादच्या नगरसेवकांची “गाडी” कशामुळे हुकली ? निघाले मुंबईला, पोचले महाबळेश्वरला !

उस्मानाबादच्या नगरसेवकांची “गाडी” कशामुळे हुकली ? निघाले मुंबईला, पोचले महाबळेश्वरला !

शासनाच्या योजनेची माहिती देण्यासाठी उस्मानाबादच्या नगरसेवकांसह नगराध्यक्षांना मुंबईत ट्रेनिंगसाठी बोलविण्यात आले होते. मुख्याधिकाऱ्यांकडे यासंबंधीचा पत्रव्यवहार झाला. राहण्याचे आणि जेवणाची सोय शासनाकडून करण्यात येणार होती. त्यानुसार नगराध्यक्षांसह सत्ताधारी पक्षाचे काही नगरसेवक मुंबईला जाण्यासाठी निघाले. दरम्यान याची माहिती विरोधी नगरसेवकांपर्यंत पोहचली. काही विरोधी नगरसेवकांनी थेट नगराध्यक्षांना विचारणा केली. दरम्यान नगराध्यक्षांनी विरोधी नगरसेवकांनाहीं ट्रेनिंगला येण्यासाठी तत्काळ होकार दिला. त्यानुसार विरोधी पक्षातील बहुतांश नगरसेवक बॅग भरून मुंबईच्या दिशेने निघण्याच्या तयारी होते. इतक्यात विरोधी पक्षाच्या गटनेत्याला याची माहिती होताच त्यांनी जिल्ह्यातील नेत्याच्या कानावर ही माहिती दिली. जिल्ह्याच्या नेत्यांनी नगरसेवकांच्या मुंबई टुरला विरोध केला. मुंबईला गटनेत्याशिवाय कोणीही जाऊ नये, असे फर्मान काढले. बॅग भरून तयार झालेल्या विरोधी नगरसेवकांची घोर निराशा झाली.  मग काय रागाने गरम झालेले नगरसेवक मुंबईतल्या दमट हवेत जाण्याऐवजी थेट महाबळेश्वरची थंड हवा खाण्यासाठी रवाना झाले. नेत्याच्या आदेशाने आणि गटनेत्याच्या या कुरघोडीने “त्या” पक्षातील काही नगरसेवक चांगलेच नाराज झाले आहेत. आमच्यावर एवढा अविश्वास नेत्यांनी दाखवू नये असं ते नगरसेवक खाजगीत सांगत आहेत. मात्र या गमतीदार प्रकाराची खुसखुशीत चर्चा नगरपालिका आणि शहरात सुरू आहे.  

COMMENTS