उस्मानाबाद – बचत खात्यातील पैसे न मिळाल्याने गमावला जीव; नातेवाईकांनी जिल्हा बँकेच्या शाखेत ठेवला मृतदेह

उस्मानाबाद – बचत खात्यातील पैसे न मिळाल्याने गमावला जीव; नातेवाईकांनी जिल्हा बँकेच्या शाखेत ठेवला मृतदेह

उस्मानाबाद – हक्काच्या ठेवीच्या पैशासाठी डीसीसी बँकेत सतत हेलपाटे मारूनही रक्कम मिळत नसल्यामुळे हताश झालेल्या सेवानिवृत्त बसचालकाचा ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. प्रकाराने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी गुरुवारी सकाळी 10.40 वाजता मृतदेह डीसीसी बँकेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून बँकेच्या कारभाराचा निषेध केला.

शहरातील गणेश नगर येथील रहिवासी गुलाबराव वीरभद्र परशेट्टी (65) हे परिवहन महामंडळात बस चालक पदावर कार्यरत होते. आयुष्यभर जमा केलेली 16 लाख रूपयांची रक्कम त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासह अन्य दोन शाखांमध्ये स्वतःच्या व पत्नीच्या नावे जमा केली होती. कुटुंबाचा खर्च आणि औषधोपचारावरील खर्चासाठी ही रक्कम परत मिळावी म्हणून ते डीसीसी बँकेच्या मुख्यालयात सतत हेलपाटे मारत होते. मात्र हजार-पाचशेच्यावर रक्कम मिळत नसल्याने ते हताश झाले होते. त्यातच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा बळी घेतला. या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी परशेट्टी यांचा मृतदेह सकाळी जिल्हा रूग्णालयातून थेट डीसीसी बँकेच्या मुख्यालयात आणला. प्रवेशद्वारासमोरच मृतदेह ठेवून बँकेने रक्कम परत द्यावी अन्यथा बँकेने लेखी पत्र दिल्याशिवाय मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा घेतला. दरम्यान काही कार्यकर्त्यांनी डीसीसी बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार, कार्यकारी संचालक विजयकुमार घोणसे पाटील यांच्याशी संपर्क साधल्यानंतर यंत्रणा हलली. अखेर अर्ध्या तासानंतर बँक प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.तिजोरीत खडखडाट असताना एटीएम सेवा सुरू केलेल्या डीसीसी बँकेचे हजारो खातेदार हक्काच्या रकमेसाठी बँकेत हेलपाटे मारत असल्याचे चित्र नेहमीच दिसत आहे. त्यातच गुरूवारी घडलेल्या या प्रकारानंतर तरी बँकेच्या कारभार्‍यांना जाग येणार का? असा सवाल केला जात आहे.

COMMENTS