एक महिन्यात पक्ष निश्चित होईल, “त्या” पक्षानं तिकीट दिलं तर लढेन नाहीतर…, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील इच्छुक डॉ. प्रतापसिंह पाटील यांची एक्सक्लुझीव्ह मुलाखत !

एक महिन्यात पक्ष निश्चित होईल, “त्या” पक्षानं तिकीट दिलं तर लढेन नाहीतर…, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील इच्छुक डॉ. प्रतापसिंह पाटील यांची एक्सक्लुझीव्ह मुलाखत !

उस्मानाबाद – लोकसभा निवडणूक आता सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभेला इच्छुक असलेले उमेदवार मतदारसंघातील गावे पिंजून काढत आहेत. यातीललच एक इच्छुक आहेत. प्रतापसिंह पाटील… शैक्षणिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेले प्रतिपसिंह पाटील आता राजकीय खेळपट्टीवर आपलं कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. नेमंक राजकीय फिल्ड कशासाठी निवडलं, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार ?  मतदारसंघाच्या विकासाच्या कल्पना काय आहेत ?  यासह अनेक विषयांवर आम्ही प्रतापसिंह पाटील यांना बोलतं केलं. त्यांच्याशी केलेली बातचीत खालील प्रमाणे आहे…..

1) सुरूवातीला सांगा तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत होता, मग राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला आणि का घेतला ?

उत्तर –

शैक्षणिक क्षेत्रात मी १९९५ पासून काम करत होतो. जवळपास २० वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम केल्यामुळे समाजातील ब-याच समस्यांची जाणीव आहे. त्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नही केले. काही समस्या सुटल्या तर काही समस्या या एखादी राजकिय सत्ता असल्यासच आपण सोडवू शकतो ही जाणीव झाली. त्यामुळे मी राजकारणात यायचा निर्णय घेतला. काही कारणास्तव उशीर झाला.

2) मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील असला तरी तुमचं कार्यक्षेत्र हे केवळ उस्मानाबाद जिल्ह्यापुरतं मर्यादित नव्हतं, मग राजकारणासाठी उस्मानाबादची निवड का केली ?

उत्तर-

माणूस जगाच्या पाठीवर कुठही गेला तरी त्याला त्याचं गाव, तालुका, जिल्हा याची ओढ राहतेच. तशीच ओढ मला देखील आपल्या जिल्ह्याची आहे. तसेच ज्यावेळेस पासून मतदानाचा अधिकार आलाय त्यावेळेपासून मी माझ्या मुळ गावी म्हणजेच बोरगाव धनेश्वरी येथे मतदान करतो.  उस्मानाबाद हा माझा जिल्हा आहे  हा जिल्हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. ही ओळख पुसण्यासाठी आपणच सर्वांनी मिळून काम करण गरजेचे आहे तरच आपल्या जिल्ह्याची प्रगती होऊ शकते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याची निवड केली.

3) गेल्या काही दिवसांपासून तुम्ही लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहात ?  कसा प्रतिसाद मिळत आहे ?

उत्तर-

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच मी समाजकार्यात रमलो होतो. पण मला प्रसिध्दी नको वाटत होती म्हणून फारसं प्रकाशझोतात न राहता काम केलं. पण जसंजसं मी वेगवेगळ्या कार्यक्रमास उपस्थित राहिलो. तसंतसं युवकांचा कल माझ्याकडे दिसुन आला. मी कुणालाही काही न देता मला लोकांच प्रेम मिळु लागलं. मग मी ठरवलं आपण राजकारणात आलं पाहिजे. म्हणून मग मी सुरुवातीला माझं गाव, माझं जि.प.सर्कल, तालुका आणि आता जिल्हा असं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांत जाऊ लागलो. प्रतिसादाचे विचाराल तर युवक, महिला वर्गातून प्रचंड प्रतिसाद मला आता मिळालाय आणि तो भविष्यात ही मिळेल. कारण लोकांच्या राजकीय नेत्यांकडून फार अपेक्षा नाहीत त्यांना फक्त ओळख देणं त्यांच्या छोट्या-मोठ्या समस्या सोडवल्या व त्यांना वेळ दिला की ते ते आपल्याला डोक्यावर घेत असतात. वरील सर्वच गोष्टी मी आज पर्यंत तंतोतंत पाळत आलोय व भविष्यात देखील मी त्या नक्की पाळेन.

4) तुमचा उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणाचा अभ्यास झाला आहे का?आणि आपण इतरांच्या नेतृत्वाखाली काम करु शकता का?

उत्तर-

गेल्या पाच वर्षापासून मी उस्मानाबादचे राजकारण व येथील राजकारण्यांचा जवळून अभ्यास केला आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत आपल्या येथील राजकारण करणाऱ्या व्यक्ती चांगल्या आहेत. अनेक बाबतीत मतभेद असतीलही, पण मनभेद नसावेत व ते आपल्या जिल्ह्यात पहायला मिळते.  मी कोणत्याही पक्षात गेलो तेथील वरीष्ठांनी घेतलेले निर्णय, सांगितलेली कामे मला करावीच लागतील. हम करे सो कायदा असं मानणारा मी कार्यकर्ता नाही, तर वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी मी चोखपणे पार पाडणारा कार्यकर्ता आहे.

5) तुम्ही कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहात हे अजूनतरी नक्की नाही ?   ज्या पक्षाकडून तिकीट मिळेल त्या पक्षाकडून निवडणुक लढवण्याची तुमची तयारी आहे असं तुम्ही म्हणता ? हा तर तुमचा संधीसाधूपणा झाला ?

उत्तर-

राजकारणात पक्ष हा निवडणूकीपुरता असतो इतर वेळी आपल्याला ज्या मतदारसंघाने निवडून दिले त्यातील संपूर्ण जनतेचे आपण लोकप्रतिनिधी असतो त्यामुळे पक्ष  व त्यांची विचारसरणी या गोष्टी महत्वाच्या असल्या तरी आपण प्रतिनिधीत्व करणा-या सर्व लोकांचे प्रश्न सोडविणे आवश्यक असते. आणि लोकांचे प्रश्न सर्वच पक्ष सोडवत असतात. राहिला प्रश्न पक्षनिवडीचा एक महिन्याच्या आत तुम्हाला माझा पक्ष समजेल. उस्मानाबाद जिल्ह्याची सामाजिक, राजकीय परिस्थिती माहीती आहे पण लवकर निर्णय घेऊन चुक करण्यापेक्षा थोड थांबून योग्य निर्णय घेतलेला बरा. माझे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या सर्वच पक्षात चांगले मित्र आहेत. त्यामुळे आपण याला संधीसाधूपणा न म्हणता याला अचूक टायमिंग साधणं असं म्हणा. तसेच लोकसभेला मला उभं रहायचंय हे निश्चित पण पक्षाने तिकीट दिले तर, अन्यथा ज्या पक्षात मी प्रवेश करेन त्या पक्षाने दिलेला उमेदवाराचा प्रचार करेन.

6) उस्मानाबाद मतदारसंघात यापूर्वीचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते आणि आता शिवसेनेचे खासदार आहेत ? त्यांच्याकडून मतदारसंघात अपेक्षित विकास झाला नाही ? मग तुम्ही असं वेगळं काय करणार आहेत की तुम्हाला मतदारांनी निवडूण द्यावे ?

उत्तर –

आपल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत विकास झाला का तर हो नक्कीच झालाय. विकास सुरुय का तर तो देखील सुरु आहे. उगी विरोधासाठी विरोध म्हणून मी काम करणारा कार्यकर्ता नाही. मला लोकांना दोष देण्यापेक्षा आपण काय करु शकतो हे सांगायला जास्त आवडेल. आपल्या जिल्ह्यात पर्जन्यमान कमी आहे त्यामुळे पडलेल्या पावसाचे नियोजन व्यवस्थित केले तरी ब-याच समस्या कमी होऊ शकतात. ते एक करण्याचा माझा प्रयत्न राहिल. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोठे उद्योग आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. कारण उद्योग आले तर आपल्याकडील बेरोजगारी कमी होऊन आपल दरडोई उत्पन्न ही वाढेल व जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. तसेच आपल्या लोकसभा मतदारसंघात तुळजापुरची तुळजाभवानी, येरमाळ्याची येडेश्वरी, बार्शीचा भगवंत, सोनारीचा भैरवनाथ, तेरचे संत गोरोबाकाका, कुंथलगिरीचे जैनबांधवांचे मंदिर, उस्मानाबाद येथील दर्गा तसेच परंडा व नळदुर्ग किल्ल्यांचा विकास केला तर आपला जिल्हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल. बाहेरच्या जिल्ह्यातील चलन आपल्या जिल्ह्यात येऊन आर्थिक विकास साधला जाईल. याशिवाय रेल्वेचा प्रश्न आहे तो सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.याशिवाय शेतीवर व दुधावर आधारीत उद्योगनिर्मिती करणं हे माझ पहिलं काम राहिल.

7) तुम्ही खासदार म्हणून निवडूण आलात तर खासदारकीच्या पाच वर्षात काय करणार ? कोणत्या गोष्टींना अग्रकम देणार ?  ते तुम्ही कसं करणार ? त्याचा प्लॅन तुमच्याकडे आहे का ?

उत्तर-

या प्रश्नाच उत्तर मी आताच दिलं आहे. तरीही मी शेतीवर आधारीत उद्योगनिर्मिती व बेरोजगारी कमी करण्यासाठी अग्रक्रम देणार आहे. आज माझ्याकडे सर्व क्षेत्रातील माणसं जवळ आहेत व मी ज्यावेळी गरज वाटेल त्यावेळी संबधित विषयात त्यांचा सल्ला देखील घेत असतो. माझा विकासाचा नुसता प्लॅनच नाही तर अक्शन प्लॅनही तयार आहे.

समाप्त

COMMENTS