उस्मानाबाद – दुष्काळी परिषदेच्या माध्यमातून लोकसभेचे रणशिंग, देवदत्त मोरे वंचित आघाडीचे उमेदवार ?

उस्मानाबाद – दुष्काळी परिषदेच्या माध्यमातून लोकसभेचे रणशिंग, देवदत्त मोरे वंचित आघाडीचे उमेदवार ?

उस्मानाबाद –  दुष्काळी परिषदेच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करीत शेतकरी संघटनेने आगामी निवडणुकीत उतरण्याचे शुक्रवारी उस्मानाबादमध्ये जाहीर केले. काँग्रेस तसेच भाजपला समान अंतरावर ठेवत समविचारी पक्षांना एकत्रीत करून आगामी काळात निवडणुका लढविण्याचे रणशिंग संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी फुंकले आहे. देवदत्त मोरे फाउंडेशन आणि शेतकरी संघटनेच्या वतीने दुष्काळी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेमध्ये रघनाथ दादा पाटील यांनी देवदत्त मोरे उस्मानाबादमधून लोकसभेचे तिकीट देण्याचे संकेत दिले. त्यामुळे दुष्काळी परिषदेच्या माध्यमातून देवदत्त मोरे यांनी लोकसभेचे रणशिंग फुंकल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

2014 मध्ये काँग्रेसचा पाडाव करीत केंद्रात आणि भाजप सत्तेवर आले. आम्ही त्यांना मदत केली. पण, तेही विश्वासघातकी निघाले. उत्पादन खर्चाच्या दिडपड भाऊ देऊ, असे आश्वासन देत सत्तेवर आले. मात्र आता त्यांना त्या गोष्टीचा विसर पडला आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे सत्तेत असलेले तसेच विरोधातील राजकीय पुढारी शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. त्यासाठी आता समविचारी तथा शेतकऱ्यांची बाजू घेणाऱ्या पक्षांना एकत्र करून निवडणुकीत उतरणार असल्याचे संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी जाहीर केले आहे. रघुनाथ दादांची शेतकरी संघटना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसोबत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शहरातील छपत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. देवदत्त मोरे फाउंडेशन आणि शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या दुष्काळ परिषदेला शेतकऱ्यांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी हजारोंच्या संखेने शेतकरी उपस्थित होते. गेल्या सात-आठ वर्षापासून देवदत्त मोरे हे जिल्ह्यात त्यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्यांनी जिल्ह्यात नाला खोली, नदी खोली, रुंदीकरण अशी शेतक-यांच्या फायद्याची कामे केली आहेत. त्यामुळे परिसरातील शेतक-यांमध्ये मोरे यांच्याविषयी चांगली इमेज आहे.

देवदत्त मोरे हे मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळा गावचे रहिवाशी आहेत. पुण्यामध्ये ते बांधकाम व्यावसायिक आहेत. पुण्यात त्यांनी या व्यवसायामध्ये मोठा जम बसवला आहे. त्यांची आर्थिक बाजू सक्षम आहे. ते ओबीसी समाजाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांचे उमेदवार मराठा समाजाचे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते एकमेव ओबीसी  उमेदवार ठरले तर त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. तसंच वंचित आघाडीची साथ मिळाली तर दलित आणि मुस्लिम मतेही त्यांना पडू शकतात. अर्थात हे जरतरचे गणित आहे. नेमकी त्यावेळी परिस्थिती कशी राहते यावरच मतदारसंघातील गणित अवलंबून राहणार आहे.

COMMENTS