उस्मानाबाद – लोकसभेसाठी चारही पक्षांत इच्छुकांची भाऊगर्दी !

उस्मानाबाद – लोकसभेसाठी चारही पक्षांत इच्छुकांची भाऊगर्दी !

उस्मानाबाद  – लोकसभेसाठी जिल्ह्यातील नेत्यांची भाऊगर्दी वाढली असून अनेकांनी गुडघ्याला बाशींग बांधले आहे. दरम्यान सर्वच पक्ष स्वबळावर लढल्यानंतर कोणाची लागू शकते वर्णी, कोण कोणाला डोईजड होईल, याचा घेतलेला आढावा. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकमेकांसाठी तुल्यबळ आहे. काँग्रेसचीही मोठी ताकद जिल्ह्यात आहे. तर भाजपनेही जिल्ह्यात चांगला जम बसविला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून आपल्यालाच कसे तिकीट मिळेल, यासाठी इच्छुकांनी तगडी फिल्डींग लावली आहे.

मलाच कसे तिकीट मिळेल, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॅ. पद्मसिंह पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान प्रकृती अस्वस्थामुळे त्यांची निवडणूक लढविण्याची शक्यतेवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून दुसरा उमेदवार कोण, यावरही खल मांडला जात आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान उपाध्यक्षा तथा राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. अर्चनाताई जिद्दी आहेत, त्यांनी जिल्हा परिषदेमध्येही चांगली छाप पाडली आहे. संपूर्ण जिल्ह्यात विकास कामाच्या माध्यमातून पिंजून काढत आहेत. पण, विधानसभा आणि लोकसभा दोन्ही उमेदवारी एकाच कुटुंबियात गेल्या तर मतदार स्वीकारतील का, याबाबतचा पक्षनेत्यांचा कौल महत्वाचा ठऱणार आहे.

दुसरीकडे डॅ. प्रतापसिंह पाटील यांचेही नाव राष्ट्रवादीकडून घेतले जावू लागले आहे. पाटील यांनी बार्शीसह परंडा, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात संपर्क ठेवून आहेत.  वेळ पडलीच तर दिलीप सोपल किंवा राहुल मोटे हेही राष्ट्रवादीचे उमेदवार होऊ शकतात. दरम्यान राष्ट्रवादीकडून जर तुल्यबळ उमेदवार मिळाली नाही तर ही जागा काँग्रेसलाही सुटू शकते. त्यामुळे काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख यांचेही नावे चर्चेत आहेत. पक्षादेश असेल तर लढावे लागेल, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वीच लातूरच्या पुढाऱ्यांनी केल्याने याबाबात तर्कवितर्क काढले जात आहेत.

शिवसेनेचे दावेदार

शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रा. रवी गायकवाड यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र त्यांच्या नावापुढे मातोश्रीवरून हिरवा कंदील मिळणार का याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. दोन वेळा आमदार, एक वेळा खासदार अशी पदे दिल्यानंतर आता पक्षकार्यासाठी वेळ द्या, असा आदेश मोतोश्रीवरून धडकणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान राष्ट्रवादीकडून पाटील कुटुंबियांमध्ये जर उमेदवारी मिळाली तर माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे अथवा उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचेही नाव चर्चेत आहेत. त्यामुळे डॅ. पद्मसिंह पाटील कुटुंबियांसोबत राजेनिंबाळकर कुटुबियांकडून जोराजी टक्कर होईल, असे राजकीय डावपेच सेनेच्या गोटात आखले जात असल्याची चर्चा आहे. याशिवाय शिवसेनेकडून शंकरराव बोरकर यांचेही नाव चर्चेत आहे. निष्ठावंत आणि ओबीसी फॅक्टरचा बोरकर यांना फायदा होऊ शकतो. त्यांच्या नावाला मातोश्रीवरून होकार मिळू शकतो. मात्र पक्षाचे उपनेते प्रा. तानाजी सावंत यांच्यासोबत बोरकर यांना जुळवून घ्यावे लागणार आहे. बोरकरांनीही मतदारसंघात फिरायला सुरूवात केली आहे.

भाजपकडूनही अनेक नावे चर्चेत

भाजपकडून जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात पक्षाने जिल्ह्यात चांगला जम बसविला आहे. अनेक ठिकाणी सत्ता मिळविण्यात पक्षाला यश आले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्टीकडून त्यांच्या नावाला हिरवा कंदिल मिळू शकतो. नितीन काळे यांचेही नाव चर्चेत आहे. पक्षादेश आला तर त्यांना लोकसभेसाठी लढावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, दोघेही विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. याशिवाय भाजपकडून डॅ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारीची आफर मिळाल्याचे बोलले जात आहे. तर भाजपकडून सुधीर पाटील यांच्याही नावाची चर्चा असून या चर्चेच्या लढाईत चारही पक्षाकडून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचित आघाडीकडून अजून कोणत्याही नावाची चर्चा नसली तरी त्यांनी उमेदवारी दिल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी काही प्रमाणात वाढू शकते.

COMMENTS