उस्मानाबाद – खासदारांच्या बैठकीत जिल्हा परिषद उपाध्यक्षांची एन्ट्री, अधिका-यांची बोलती बंद !

उस्मानाबाद – खासदारांच्या बैठकीत जिल्हा परिषद उपाध्यक्षांची एन्ट्री, अधिका-यांची बोलती बंद !

उस्मानाबाद – दुष्काळी उपाय योजना संदर्भात खासदार रविंद्र गायकवाड यांनी कळंब येथे बोलावलेल्या आढावा बैठकीमध्ये अचानक जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील दाखल झाल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे सर्वत्र खासदार, आमदार हे टंचाईच्या आढावा बैठका घेत आहेत. तर शासकीय अधिकारी हे दुष्काळाची काय परिस्थिती आहे. याची माहिती घेण्यासाठी ग्राऊड रिपोर्ट घेऊन माहिती संकलीत करण्याचे काम करत आहेत.

सध्या दुष्काळामुळे बडे नेते मंडळी व शासकीय अधिकारी हे जमिनीवर उतरून काम करत असल्याचे दिसून येत आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यासह कळंब तालुक्याची सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही. तालुक्याला दुष्काळाची किती कळ लागली आहे. याची शासकीय अधिकारी यांच्याकडुन माहिती घेण्यासाठी दिनांक २९ ऑक्टोबर रोजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी पंचायत समिती सभागृहात टंचाईच्या संदर्भात आढावा बैठक बोलावली होती. यावेळी विविध कार्यालयीन अधिकारी हे स्वतःचे पाढे सांगत होते आणि सर्व मंडळी ऐकत होती. एकप्रकारे शासकीय बैठक असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील व कळंब पंचायत समिती सभापती दत्तात्रय साळुंके हे दाखल झाल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.

त्यानंतर अधिकारी हे माहिती सांगत असताना उपाध्यक्षा पाटील यांनी प्रत्येक अधिका-याची सांगण्यात येणारी माहिती क्रॉस चेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही अधिका-याची बोबडी वळली होती. पशुसंर्वधन अधिकारी यांनी चक्क ९८ हजार मेट्रीक टन चारा शिल्लक आहे अशी माहिती देताच अर्चना पाटील यांनी रब्बी पेरणी झाली नाही तरी सध्दा एवढा चारा कसा काय उपलब्ध असा उलट प्रश्न केल्यावर तालुका कृषि अधिकारी अशोक संसारे यांनी काहीच चारा शिल्लक नाही असे सांगितले. त्यामुळे अधिकारी हे आढावा बैठकीमध्ये सुद्धा लोकप्रतिनिधी यांना खोटी माहिती सांगतात हे उघड झाले. संबंधित अधिका-याला खासदार गायकवाड काही बोलतील असे वाटत होते परंतु त्यांनी आपल्या शैलीमध्ये शांत राहणे पसंत केले. त्यामुळे ही आढावा बैठक खासदार यांची होती का जिल्हा परिषद उपाध्यक्षा यांची होती अशी चर्चा सभागृहात सुरू झाली असुन ही आढावा बैठक अर्चना पाटील यांनी हायजॅक केल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरात सुरु होती.

शेवटी अर्चना पाटील यांनी तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे आपण लक्ष घालून चारा छावण्यांकरीता प्रयत्न करावा अशी मागणी खासदार रविंद्र गायकवाड यांच्याकडे केली असता त्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे अश्वासन दिले.

COMMENTS