वाघाच्या पोटी वाघीणच जन्मणार – पंकजा मुंडे

वाघाच्या पोटी वाघीणच जन्मणार – पंकजा मुंडे

बीड – संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला सुरूवात झाली आहे. या मेळाव्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण केलं आहे. घरची पुरणपोळी सोडून तुम्ही आलात याबद्दल आभार मानते असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. आज माझा आवाज समोरच्या लोकांनाच नव्हे तर राज्याच्या कानाकोप-यापर्यंत येतो आहे. मी मुंडे साहेबांसोबत अनेकवेळा भगवान गडावर गेले, आज भगवान बाबा नगर जिल्ह्यातून सीमोल्लंघन करून बीड जिल्ह्यात आले आहेत. तसेच वाघाच्या पोटी वाघीणच जन्मणार. त्यामुळे मी वाघीण आहे असं पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान गरीबाच्या झोपडीपर्यंत राजकारण मुंडेंनी नेलं,शब्दाला माझ्या जीवनात महत्व आहे. मी दिलेला शब्द पाळला, भगवान बाबांचं मंदिर इथं बांधलं तर बिघडलं कुठं,काही लोकांनी टीका केली. हा भक्तांनी बनवलेला गड, कर्मभूमी भगवानगड तर जन्मभूमी सावरगाव, याचं नाव भगवान भक्ती गड असं असल्याचंही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

आम्ही भक्तीचा बाजार मांडत नाहीत,उसतोडी कामगार माझी बँक आहे,माझी संपत्ती आहे,माझं फिक्स डिपॉझिट आहे,कोणी तरी ऐरे गैरे म्हणतात वोट बँक आहे,तर खोटं आहे. असा टोलाही यावेळी पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेट ऊसतोड कामगार महामंडळ उद्यापर्यंत जाहीर होणार असल्याचंही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दिलेला शब्द मी पाळते,टँकर मुक्त महाराष्ट्र केला, लोकांना घरं दिली, रस्ते केले. विकास केला. तसेच एक कोटीचा निधी ऊसतोड कामगार महामंडळाला देणार असल्याची घोषणाही यावेळी पंकजा मुंडे यांनी केली आहे. दुष्काळाच्या मुद्यावर थेट जनतेशी संवाद साधणार असून मराठवाड्याकडे निसर्गाने पाठ फिरवली तरी पंकजा आणि माझं सरकार तुमच्याकडे पाठ फिरवणार नसल्याचंही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

यावेळी पंकजा मुंडे यांनी भाजपनं केलेल्या सर्व्हेबाबतही आपलं मत मांडलं आहे. कसला सर्व्हे अन कसलं काय,सर्व्हे खोटे आहेत,अस म्हणत बातम्या खोट्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच सर्व्हे बघून नव्हे तर माणूस बघून तिकीट दिले जाते असंही त्या म्हणाल्या आहेत.

2019 ला पुन्हा सत्ता येणार,देशात आणि राज्यात सत्ता आणण्याची शपथ घेऊन भगवान बाबांच्या जन्मगावाहून जाणार आहे. भरल्या ताटावरून गोपीनाथ मुंडे उठून गेले,तुमच्यासाठी स्वप्न पाहिले मात्र मध्येच तर निघून गेले असं म्हणत त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

COMMENTS