पंकजा मुंडे यांनी अहिल्यादेवींच्या चौंडीत तरूणांमध्ये जागवली ‘नव चेतना’ !

पंकजा मुंडे यांनी अहिल्यादेवींच्या चौंडीत तरूणांमध्ये जागवली ‘नव चेतना’ !

चौंडी (अहमदनगर) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी जे कार्य केले ते खूप मोठे आहे, त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करतांना आजच्या तरूणांनी समाजाच्या हितासाठी कांही करायचेच असेल तर जातीभेदाच्या भिंती तोडून एकजुटीने काम केले पाहिजे. पाठीवर जबाबदारीचं ओझं समजून पुढे आले पाहिजे, यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेऊन काम करण्याची गरज आहे, मी सुद्धा तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी असेल अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज चौंडी येथे तरूणांमध्ये ‘नवचेतना’ जागवली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९४ वा जयंती समारोह त्यांची जन्मभूमी असलेल्या चौंडी येथे आज मोठ्या उत्साहात व अलोट जनसागराच्या साक्षीने पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. गणपतराव देशमुख तर प्रमुख पाहूणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती खा. संभाजीराजे भोसले, जलसंधारण मंत्री तथा स्वागताध्यक्ष प्रा. राम शिंदे, खा. विकास महात्मे, अण्णा डांगे, आ. मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डीले, रामराव वडकुते, रमेश शेंडगे, बबनराव पाचपुते, आ. भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, गोपीचंद पडाळकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोकनेते मुंडे साहेबांनी आयुष्यभर तळागाळातील सर्व सामान्य माणसासाठी काम केले, तेच काम मला पुढे न्यायचे आहे. वंचितांसाठी काम करतांना आम्ही कधीच राजकीय जोडे घातले नाहीत, नेहमी त्यांचेसाठी लढलो आणि लढत आहोत. समाज हितासाठी कांही करायचे असेल तर तरूणांनो जातीच्या भिंती झुगारा, राजकीय जोडे बाजूला ठेवा, जबाबदारीचं ओझं समजून पुढे या असे आवाहन त्यांनी केले. समाज हितासाठी तुम्ही कांहीतरी चांगले काम करत असाल तर मी ही तुमच्यासोबत आहे असेही त्या म्हणाल्या. धनगर समाजासाठी काम करणा-या गोपीचंद पडाळकर यांचे यावेळी त्यांनी कौतुक केले.

आरक्षणासाठी केंद्राचा अहवाल सकारात्मक
———————-
काॅग्रेस राजवटीत धनगर समाजाला आरक्षण मिळू शकले नाही, धनगड चा धनगर करण्यात सत्तर वर्षे त्यांनी घातली. परंतू आम्ही सत्तेवर येताच धनगर समाजाला न्याय देण्यासाठी आदिवासींच्या सवलती देण्याचा निर्णय घेत धनगर व धनगड हे दोन्ही एकच आहेत यासाठी टीसचा अहवाल मागितला. त्यांनीही सकारात्मक अहवाल दिला त्यानुसार केंद्र सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे त्यामुळे आरक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे असा विश्वास देत पंकजा मुंडे यांनी यासाठी राजकीय इच्छाशक्ती जपून ठेवण्यासाठी राजकीय शक्तीचीही गरज असल्याचे म्हटले.

हे ॠण जनतेचे ; सेवेत कमी पडणार नाही
———————–
लोकसभा निवडणुकीत तुम्ही आम्हाला देशात व राज्यात भरभरून मतं दिली. डाॅ. प्रितम मुंडे यांचाही बीडमध्ये मोठा विजय झाला. केंद्रात पुन्हा आम्ही सत्तेवर आलो, त्यामुळे तुमचे प्रत्येक मत हे आमच्यावर ऋण आहे, हे ऋण फेडायचे असेल तर तुमचे जीवनमान चांगलं करणं हे आमच्या प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे. जनतेची सेवा करत राहणे हेच अहिल्यादेवीचे ध्येय होते आणि त्याच वाटेवर चालून मी सुद्धा आयुष्यभर जनतेची सेवा करण्यात कमी पडणार नाही असे त्या म्हणाल्या.

शपथविधीच्या वेळी मुंडे साहेबांचा चेहरा डोळ्यासमोर आला
————————
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याची आठवण सांगताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, काल मी दिल्लीला गेले खरी परंतु शपथविधी सोहळ्यासाठी आंत जाण्याची हिंमत झाली नाही, कारण वंचित पिडित घटकांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर लढणारे मुंडे साहेब नाहीत, हे पाहून त्यांचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. जीवनात आता कमवायचे कांही राहिले नाही, कमवायचे आहे ते फक्त तुमचे आशीर्वाद व तुमचे उत्थान करण्यासाठी छोटेसे योगदान असे त्यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या भावनांना प्रतिसाद दिला.

प्रारंभी पंकजा मुंडे यांचे चौंडीत हेलिकाॅप्टरने आगमन झाले. व्यासपीठावर येण्यापूर्वी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे दर्शन घेतले. प्रा. राम शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्यभरातून धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने समारोहाला उपस्थित होता.

COMMENTS