धांगडधिंगा करण्यापेक्षा सीएम चषक स्पर्धांमुळे शहरातील सांस्कृतिक चळवळ सुदृढ – पंकजा मुंडे

धांगडधिंगा करण्यापेक्षा सीएम चषक स्पर्धांमुळे शहरातील सांस्कृतिक चळवळ सुदृढ – पंकजा मुंडे

परळी -सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली धांगडधिंगा करण्यापेक्षा इथल्या महिला, युवक व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भाजपने आयोजित केलेल्या सीएम चषक स्पर्धांमुळे शहरातील सांस्कृतिक चळवळ सुदृढ होण्यास एकप्रकारे मदतच झाली असे सांगून महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी आगामी काळात विशेष प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले.

भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सीएम चषक स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज अक्षता मंगल कार्यालयात बक्षिसांचे वितरण करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ प्रितम मुंडे तर व्यासपीठावर आ. संगीता ठोंबरे, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन, भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, डाॅ. शालिनी कराड, रिपाइंचे नेते धम्मानंद मुंडे, शेख अब्दुल करीम, श्रीराम मुंडे, रमेश कराड, वैजनाथ जगतकर, नगरसेवक पवन मुंडे, दत्ता कुलकर्णी, उमाताई समशेट्टे, योगेश मेनकुदळे, अंजली माळी, प्रिती लेणेकर, वर्षा पिंपळे, प्रेमला बाहेती, लताताई देशमुख, मंगला लिंगाडे, रेखा मिरकले, सुशीला फड आदी उपस्थित होते.

गौरी गणपती व टर्निंग पाॅईंटच्या माध्यमातून आपण या अगोदर शहरात चांगल्या कार्यक्रमाचा पायंडा पाडला होता परंतु मुंडे साहेब गेल्यानंतर हे कार्यक्रम होवू शकले नाहीत असे सांगून ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, आता पुन्हा एकदा सीएम चषक स्पर्धेच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आहे. निवडणूक हा विषय बाजूला ठेवून महिला, युवक व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये संधी मिळावी यासाठी याचे आयोजन आम्ही केले.रांगोळी, चित्रकला, धावणे आदी स्पर्धांमध्ये महिला व मुलींनी हिरिरीने सहभाग घेतला ही खरोखरच अभिनंदनीय बाब आहे. महिलांना शक्ती देण्याची आज खरी गरज आहे. घराची दशा आणि दिशा बदलण्याची ताकद त्यांच्यात आहे त्यामुळेच तीला सक्षम बनविण्याचे काम करत आहोत. शहरात एक चांगलं क्रीडा संकुल, जलतरण तलाव असावा अशी माझी इच्छा असून लवकरच ती पुर्ण होणार आहे. मुलींना ज्युडो कराटेत पारंगत करून स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग आपण सुरू करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

जनतेला सोबत घेऊन विकास

शहरात चांगले कार्यक्रम झाले पाहिजेत, इथल्या युवक व महिलांना विविध स्पर्धांमध्ये संधी मिळाली पाहिजे यासाठी मला सकारात्मक वातावरण तयार करायचे आहे. शहरात चांगले रस्ते, स्वच्छता व प्रत्येकाला घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. २०१४ व आताच्या परिस्थितीत खूप बदल झाला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही गरीबांसाठी काम करत आहोत. नुसता विकासच नाही तर समाज बांधण्याचे काम सरकार विविध योजनांमधून करत असल्याचे त्या म्हणाल्या. जनतेला सोबत घेऊन विकास साधतांना सर्वांचे सहकार्य व सहभाग यासाठी मला महत्वाचा असल्याचेही त्या म्हणाल्या.

खा. डाॅ. प्रितम मुंडे
—————————–
पालकमंत्री या नात्याने ना पंकजाताई मुंडे यांनी शहराच्या पालकत्वाची जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावली. त्यांनी भौतिक विकास तर साधलाच पण या स्पर्धामधून सांस्कृतिक चळवळीला देखील प्रोत्साहन दिले. गौरी गणपती व टर्निंग पाॅईंटच्या माध्यमातून यापूर्वीही त्यांनी ही चळवळ प्रभावीपणे राबविली होती. आता असेच कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात होतील असा विश्वास खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलतांना व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचलन शेखर फुटके, प्रास्ताविक अॅड. अरूण पाठक यांनी केले. यावेळी आ. ठोंबरे, प्रा. पवन मुंडे, उमाताई समशेट्टे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास शहरातील महिला, युवक, विद्यार्थी, पालक तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS