टवाळखोरांनी केलेले उद्घाटन हा तर निव्वळ बालिशपणा – पंकजा मुंडे

टवाळखोरांनी केलेले उद्घाटन हा तर निव्वळ बालिशपणा – पंकजा मुंडे

परळी – राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना परळी मतदारसंघासाठी एकही इमारत अथवा रस्ता मंजूर करू न शकणारे लोक माझ्या खात्यामार्फत मंजूर झालेल्या कामांचे रात्रीत उद्घाटन करत आहेत. अशा लोकांना सत्ता असताना एकाही कोनशिलेवर स्वतःचे नाव का लावता आले नाही असा सवाल करत टवाळखोरांनी केलेले उद्घाटन हा तर निव्वळ बालिशपणा होता अशी खरमरीत टीका राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.

परळी शहरात पाच कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या नूतन भव्य आणि देखण्या इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून १२५० कोटींचा निधी दिला. रस्त्यां व्यतिरिक्त जिल्ह्यातील प्रशासकीय इमारती, कर्मचारी निवासस्थान , बस स्थानक, रुग्णालये अशा अनेक नूतन इमारती बांधण्यासाठी भरीव निधी दिला असून त्याचाच परिपाक म्हणून परळी पंचायत समितीची नूतन आणि सुंदर देखणी इमारत आज लोकार्पित झाली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या भव्य नूतन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून १८ कोटी रुपयांचा निधी या इमारतीसाठी उपलब्ध करून दिला असून राज्यात कुठेही निधी वाटप करताना भेदभाव केला नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

टवाळखोरांचा बालिशपणा, तर… आयुष्यभर रात्रीतच उद्घाटनं करावी लागतील
——————–
पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली. पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसताना नियमबाह्य उदघाटन काल रात्री काही टवाळांकडून केले गेले. राजकारणात असे कृत्य शोभनीय नाही. केवळ परळीच नाही तर जिल्हयातील सर्व पंचायत समितीच्या इमारतीला मी निधी दिला, यात कोणताही भेदभाव केला नाही. परळीची पंचायत समिती भाजपच्या ताब्यात असतांना निधी मंजूर केला, नंतर ही समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली म्हणून मी काम रखडविले नाही, मला जनतेसाठी काम करायचे आहे, श्रेयासाठी नाही असे त्या म्हणाल्या. सामान्य माणसांसाठी काम करत असताना श्रेयवादाचं राजकारण करत राहिले तर जिल्ह्यातील प्रत्येक इमारतीवर व प्रत्येक विटेवर पंकजा मुंडे हे नाव लावावे लागले असते असे सांगून राष्ट्रवादीची सत्ता असताना मतदारसंघात तुम्हाला विकासाची एकही कोनशिला लावता आली नाही, एवढेच काय जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या एकाही बैठकीत तुम्ही आला नाहीत अशा शब्दांत विरोधी पक्षनेत्यांवर त्यांनी निशाणा साधला. विकास कामांत खेकडा प्रवृत्तीचा विरोध करणाऱ्या श्रेयवादी लोकांना भविष्यात मी केलेल्या कामांची रात्रीतच उदघाटन करण्याची नामुष्की येईल अशी टीका पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.

शहीद जवानांच्या कुटूंबियांस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची लाख मोलाची मदत
————————
गडचिरोली जिल्ह्यात नक्षवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले पाटोदा येथील जवान शेख तौसिफ शेख शेख आरिफ यांच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे एक लाखाची आर्थिक मदतीचा धनादेश पंकजा मुंडे यांनी यावेळी त्यांच्या कुटूंबियांकडे सुपूर्द केला तसेच जिरेवाडी येथील सरस्वती महिला बचत गटाला दीड लाख रुपयांचे बँक अर्थसहाय्य यावेळी वितरित करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, डाॅ. शालिनी कराड, सतीश मुंडे, बिभीषण फड, धम्मानंद मुंडे, पं. स. सदस्य भरत सोनवणे, मोहनराव आचार्य, भास्कर फड, मुरलीधर साळवे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कंत्राटदार सुंदर मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे स्वागत केले. यावेळी पंचायत समितीच्या आवारात पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

विश्रामगृहाचे भूमिपूजन
————————–
पंचायत समितीच्या लोकापर्ण पूर्वी ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शहरातील शिवाजी चौक परिसरात दहा कोटी २७ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणा-या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन थाटात पार पडले.

COMMENTS