विरोधकांवर भावनेचं राजकारण करण्याची वेळ – पंकजा मुंडे

विरोधकांवर भावनेचं राजकारण करण्याची वेळ – पंकजा मुंडे

बीड, परळी – विरोधकांकडे करण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे त्यांच्यावर भावनिक आवाहने करीत फिरण्याची वेळ आली आहे अशी टीका राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे केली. माझं नातं थेट जनतेशी आहे, त्यांच्या विकासाकरिता आयुष्याचा प्रत्येक क्षण मी दिला आहे आणि त्यांचेसाठीच माझे राजकारण आहे असेही त्या म्हणाल्या.

तालुक्यातील सोनहिवरा येथे ९० लाख रुपये खर्चाची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, २० लाखाचे सामाजिक सभागृह व दीड कोटीच्या रस्त्याचे लोकार्पण तसेच विविध योजनेतील तीन कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार डाॅ प्रितमताई मुंडे, भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, रमेश आप्पा कराड, तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नेताजी देशमुख, जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, गयाताई कराड, डाॅ. शालिनी कराड, सुधाकर पौळ, भीमराव मुंडे, रमेश कराड, बिभीषण फड, सरपंच शशिकला सरवदे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी ग्रामस्थांनी वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढली, जागोजागी रस्त्यावर रांगोळी काढून सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले.

आतापर्यंत आपल्याकडे सत्ता नव्हती म्हणून या भागाचा विकास होऊ शकला नाही. लोकनेते मुंडे साहेबांवर इथल्या जनतेने खूप प्रेम केले, त्यांना शक्ती दिली त्यामुळे त्यांच्या प्रेमाची पावती म्हणून मी माझा प्रत्येक क्षण तुमच्या विकासासाठी दिला. मी कुणाचा पराभव करण्यासाठी नाही तर सर्व सामान्य माणसाच्या कल्याणासाठी राजकारणात आले आहे. सत्तेच्या माध्यमातून प्रत्येक गावांत भरभरून निधी दिला, रिकाम्या हाताने कुठं गेले नाही, कांहीतरी योजना घेऊनच गेले असे सांगून पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे, त्यामुळे तुमचे मतदान भावी मंत्र्यांलाच पडणार आहे, विनाकारण मत वाया घालवू नका. विरोधकांकडे आता करण्यासारखं कांहीच राहयलं नाही म्हणूनच आता भावनिक आवाहने करण्याची वेळ त्यांचेवर आली आहे. मी स्वाभिमानाने वागले, कुणापुढे कधी झुकले नाही, मला दुसरे काही नको, फक्त तुमचे आशीर्वाद पाहिजेत असे त्या म्हणाल्या.

पंकजाताईंना देण्याची वेळ आता आपली- खा. डाॅ. प्रितमताई मुंडे
————————
ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या मंत्री पदाचा पुरेपूर उपयोग आपल्या भागाच्या विकासासाठी केला, त्यांनी आपल्याला भरभरून दिले आहे आता त्यांना देण्याची वेळ आपल्यावर आहे. गावातील कोणतेही काम असो ते पंकजाताई यांनीच केले आहे त्यामुळे विकासाची ही गंगा वाहती ठेवण्यासाठी लोकसभेपेक्षा अधिक मताधिक्य त्यांना द्या असे आवाहन खासदार डाॅ प्रितम मुंडे यांनी यावेळी केले.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तांड्यावर रस्ता, बंजारा बांधव खूश
——————————
केवळ सहाशे लोकवस्ती असलेल्या लिंबुटा तांडा याठिकाणी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रस्ता होत आहे. पंकजा मुंडे यांनी इथल्या ग्रामस्थांची गरज ओळखून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून १ कोटी १६ लक्ष रूपये रस्त्यासाठी मंजूर केले. या रस्ता कामाचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झाले, यावेळी आनंदित झालेल्या तांड्यावरील बंजारा समाजातील महिलांनी त्यांचे वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत केले. यावेळी महिलांनी त्यांचेभोवती फेर धरून पारंपारिक गाणेही गायले. पंकजा मुंडे या देखील त्यांच्या आनंदात सहभागी झाल्या होत्या. यावेळी दोन कोटीच्या कामाचे लोकार्पण व पावणे दोन कोटी च्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. लिंबुटा येथील सरपंच सुदाम मुंडे, मोहन मुंडे, गणेश गिते, पप्पू चव्हाण, संतोष राठोड, बाबुराव राठोड, प्रकाश राठोड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS