पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत परळीत लिंगायत समाजाचे स्नेहमिलन !

पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत परळीत लिंगायत समाजाचे स्नेहमिलन !

बीड, परळी – महाराष्ट्र वीरशैव सभा परळी शाखेच्या वतीने राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज बेलवाडीत दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वीरशैव सभेचे प्रांताध्यक्ष बाबासाहेब कोरे, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विजयकुमार मेनकुदळे, नगरसेविका उमाताई समशेट्टे, नगरसेवक अनिल आष्टेकर, चनबसआप्पा गिरवलकर आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी बोलतांना पंकजा मुंडे  म्हणाल्या की, राज्यात मोठ मोठे कार्यक्रम, सभा मी करते पण या परळीची लेक म्हणून मी वावरत असते.गर्दीमुळे या माझ्या घरच्या,कुटूंबाच्या लोकांसोबत मला संवाद साधता आला नाही. चार वर्षे खूप कामे केली. साहेबांनंतर पहिल्यांदाच दिवाळी परळीत सर्वांसोबत साजरी केली त्याचा आनंद आहे. लिंगायत समाजाने साहेबांवर जीवापाड प्रेम केले तेच प्रेम आज देखील कायम आहे हे आपल्या उपस्थिती वरून लक्षात येते असेच प्रेम कायम असू द्या असे  त्या म्हणाल्या. माणूस कोणत्या जातीत जन्माला येतो हे महत्वाचे नसते तर त्याने कोणाला जवळ केले याला महत्व आहे. महात्मा बसवेश्वरांनी त्याकाळी जाती व्यवस्था, रचना बदलून सर्वांना एकत्र भक्तीचा आणि समानतेचा मार्ग दाखवला. इतके पुढारलेले नेतृत्व आपल्याला लाभलं हे आपलं भाग्य आहे. साहेबांनी देखील याचा शिकवणीवर चालत सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेत सर्वांची मोट बांधली आणि त्याचे नेतृत्व केले. आज जाती धर्माच्या पलीकडे जाऊन भक्ती करणाऱ्या लोकांच्या मध्ये मला येता आले हे माझं भाग्य समजते.

ज्या परळीत साहेबांचा जन्म झाला,माझा जन्म झाला त्या भूमीचे नाव देशात,परदेशात नेण्याची संधी मिळाली हे माझे नशीब आहे. परळी शहरासाठी खुप काही करायचं राहून गेलं. भविष्यात ती संधी पुन्हा घेऊन या परळीचा विकास आणि कायापालट करणार असल्याचे त्या म्हणाल्या. मला मिळालेली संधी ही तुमची संधी आहे. माझा जय पराजय,यश हे तुमचे असेल यासाठी सर्व समाजाची मोट बांधू, आणि चांगलं परिवर्तन  करू असे त्यांनी सांगितले. तुमच्या हक्काच्या प्रत्येक लढ्यात मी तुमच्या बाजूने असेल असे त्या म्हणाल्या. यावेळी विविध पदावर नियुक्ती झालेल्या आणि गुणवंत समाज बांधवांचा सत्कार पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

COMMENTS