अभिजित देशमुख यांच्या कुटुंबियांना शासनाकडून दहा लाखांची मदत – पंकजा मुंडे

अभिजित देशमुख यांच्या कुटुंबियांना शासनाकडून दहा लाखांची मदत – पंकजा मुंडे

मुंबई – बीड जिल्हयातील विडा येथील अभिजित देशमुख या तरूणाच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज तीव्र दुःख व्यक्त करून त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले. कोणत्याही तरूणांनी अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, अभिजितच्या कुटूंबियांना शासनातर्फे दहा लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून त्याच्या भावाला नोकरी देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे त्या म्हणाल्या.

अभिजित देशमुख रा. विडा ता. केज या तरूणाने आज सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी तातडीने स्थानिक नेत्यांना घटनास्थळी भेट देण्यासाठी पाठवून देशमुख कुटूंबियांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. बीडचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना संपर्क साधून घटनेची अधिक माहिती त्यांनी जाणून घेतली. अभिजितच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्याच्या निधनामुळे देशमुख कुटूंबियांवर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे, त्याच्या कुटुंबियांना शासनातर्फे दहा लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून भावाला नोकरी देण्याची आपली भूमिका आहे त्यासाठी आपण निश्चित प्रयत्नशील राहू असे ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

कोणत्याही लढ्याला वैधानिक दृष्टीतून व घटनात्मक पध्दतीने न्याय मिळण्यासाठी संघर्ष करण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिली आहे त्यामुळे कोणत्याही तरूणांनी आत्महत्या सारखे पाऊल उचलू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

COMMENTS