पंकजा मुंडेंनी रासपच्या महामेळाव्यात धनगर बांधवांना केलं ‘हे’ आवाहन !

पंकजा मुंडेंनी रासपच्या महामेळाव्यात धनगर बांधवांना केलं ‘हे’ आवाहन !

मुंबई – मागील सत्तर वर्षे काँग्रेस- राष्ट्रवादीने धनगर बांधवांना आरक्षणाचे नुसते गाजर दाखवले, प्रत्यक्षात मात्र काहीही केले नाही, त्यामुळे जनतेने त्यांना साफ नाकारले. काँग्रेसमुक्त महाराष्ट्राची घोषणा आम्ही केली होती, ती खरी तुम्ही केली आता राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल रासपच्या महामेळाव्यात बोलतांना केले.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर रासपचा महामेळावा काल मोठ्या उत्साहात पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष अकी सागर, आ. राहूल कुल, आ प्रवीण दरेकर, शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बालासाहेब दोडतले, शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, सिने अभिनेत्री सपना बेदी, युवा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड आदी यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, धनगर बांधवांच्या पाठीशी मी नेहमीच खंबीरपणे उभा राहिले आहे, त्यांच्या घोंगडी व काठीत मायेची उब आणि शक्ती सामावलेली आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना मंत्री करण्याचा आपण शब्द दिला होता तो पूर्ण केला. धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मंत्रालयाची पायरी चढू शकणार नाही असे मी म्हणाले होते आणि त्यानंतर झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत आदिवासींच्या सवलती व कोट्यवधीचे बजेट सरकारने दिले, तथापि सत्तर वर्षे ज्या काँग्रेस- राष्ट्रवादीने आरक्षणाचे नुसते गाजर दाखवले, त्यांनी मात्र काहीही केले नाही, काँग्रेसमुक्त महाराष्ट्राची घोषणा आम्ही केली होती, ती खरी केली आता राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे. रासप १६ वर्षाचा झाला, हे वर्ष धोक्याचं असतं असं कुणीतरी भाषणात म्हटलं, पण हा धोका कुणासाठी आहे? असं विचारताच खालून एका सुरात ‘राष्ट्रवादी’ ला असे प्रत्युत्तर मिळाले.

केंद्र व राज्य सरकारने सर्व सामान्य माणसाचा विकास करण्याबरोबरच विश्वासही जिंकला आहे असे सांगत पंकजा मुंडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे होळकर यांच्या उत्कृष्ट राज्य कारभाराचा आदर्श समोर ठेवून मी राजकारण करत असल्याचे सांगितले. जानकरांचे व माझे बहिण-भावाचे नाते अतुट आहे त्यामुळे येणा-या निवडणूकीत भाजपा शिवसेना व रासप महायुतीचे गठबंधन सामान्य माणसांची सत्ता पुन्हा एकदा आणल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी ना. महादेव जानकर यांनी देखील राज्यात महायुतीची सत्ता आणण्यासाठी रासपच्या कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घेण्याचे आवाहन केले. महा मेळाव्याला राज्य काना कोप-यातून धनगर समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

COMMENTS