पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या शेतक-यांच्या व्यथा !

पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या शेतक-यांच्या व्यथा !

बीड – महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून बीड जिल्हयात सुरू असलेली शासकीय कापूस खरेदी केंद्रे गेल्या दहा दिवसापासून बंद असल्याने कापूस उत्पादक शेतक-यांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे, ही खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावी तसेच कापूस खरेदीचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करावेत अशी मागणी करत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे जिल्ह्यातील शेतक-यांच्या व्यथा मांडल्या आहेत.

मराठवाड्यात मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली आहेत. त्यात महाराष्ट्रासह मराठवाड्यात झालेल्या परतीच्या पावसाने कापसाची प्रत घसरली असून उताराही घटल्याने खाजगी बाजारात कापसाचे दर कमी झाले आहेत. शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक व नुकसान होवू नये म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने २७ नोव्हेंबर पासून शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरु केली होती. बीड जिल्ह्यात साधारण २४ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली तथापि ती सर्वच खरेदी केंद्र २० जानेवारी पासून बंद झाली आहेत.

त्यामुळे शेतकर्‍यांना कमी भावाने खाजगी व्यापार्‍यांना कापूस विकावा लागत आहे, परिणामी शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान होत आहे. बीड जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी केंद्रात विक्री केलेल्या साधारण ३१ हजार शेतकर्‍यांपैकी १० हजार शेतकर्‍यांना त्यांचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. पाऊस नसल्याने अगोदरच दुष्काळी परिस्थिती आणि त्यातच खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान व पिळवणूक थांबविण्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू होणे आवश्यक आहेत, कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावीत व प्रलंबित शेतकर्‍यांच्या कापूस खरेदीचा मोबदला लगेचच त्यांच्या बँक खात्यात जमा करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा असे पंकजा मुंडे यांनी निवेदनात नमुद केले आहे.

COMMENTS