अपूर्ण घरकुले जलद गतीने पूर्ण करण्यासाठी पंकजा मुंडेंचा महत्त्वपूर्ण निर्णय !

अपूर्ण घरकुले जलद गतीने पूर्ण करण्यासाठी पंकजा मुंडेंचा महत्त्वपूर्ण निर्णय !

मुंबई – प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व इंदिरा आवास योजनेंतर्गत अपुर्ण राहिलेली घरकुले जलद गतीने पुर्ण करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कर्मचार्‍यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. हा भत्ता देण्यासाठी ४ कोटी १६ लाख ६३ हजाराची तरतुद त्यांनी केली आहे.

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व इंदिरा आवास योजनेंतर्गत अपुर्ण राहिलेली घरकुले जलद गतीने पुर्ण करणे सध्या आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तसेच तालुका स्तरावरील कर्मचार्‍यांना व बाह्य यंत्रणेव्दारे उपलब्ध मनुष्यबळास अतिरीक्त प्रोत्साहन रक्कम मंजूर केल्यास अपुर्ण घरकुले जलद गतीने पुर्ण होण्याची शक्यता आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांनी ही बाब विचारात घेवून ग्रामस्तरावर काम करणारे ग्रामीण अभियंता यांना प्रति घरकुल ३०० रुपये, ग्रामसेवकांना १७५ रुपये व तालुका स्तरावर काम करणार्‍या डेटा एंट्री ऑपरेटरला प्रति घरकुल २५ रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंदिरा आवास योजनेसाठी एक कोटी एक लाख ४३ हजार तर प्रधानमंत्री आवास योजनेकरीता ३ कोटी १५ लाख २० हजार ५०० अशी एकुण ४ कोटी १६ लाख ६३ हजार ५०० रुपये एवढा खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

अपुर्ण घरकुलांपैकी प्रस्तुत प्रोत्साहन रक्कम लागू केल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांपर्यंत या कालावधीत जी घरकुले पुर्ण करण्यात येतील अशाच घरकुलांसाठी सदर प्रोत्साहन रक्कम अनुज्ञेय राहील. या कालावधीनंतर पुर्ण करण्यात आलेल्या घरकुलांसाठी प्रोत्साहन रक्कम अनुज्ञेय राहणार नाही तसे ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी काढलेल्या आदेशात नमुद केले आहे. कर्मचार्‍यांना सदर प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोरगरीबांना मिळणारी घरकुले वेळेच्या आत पुर्ण होतील असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS