जवानांवरील भ्याड हल्ल्याला जशास तसे उत्तर दिले जाईल – पंकजा मुंडे

जवानांवरील भ्याड हल्ल्याला जशास तसे उत्तर दिले जाईल – पंकजा मुंडे

पुणे – सहिष्णुता हा आपल्या  देशातील प्रत्येक नागरिकांचा अलंकार आहे. या मार्गाने मार्गक्रमण करत जगाच्या स्पर्धेत आपण खूप पुढे आलो आहोत.आपला देश सहिष्णुतेच्या मार्गाने जगाचे नेतृत्व करत आहे, पण आपल्या सहिष्णुतेचा चुकीचा अर्थ घेऊन जर कुणी आपल्यावर हल्ला करत असेल तर आपला देश आणि देशाची सुरक्षा यंत्रणा त्यांना जशास तसे उत्तर देईल असे सांगून राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजा मुंडे यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

पुणे येथे संरक्षण विभागाच्या वर्किंग वुमेन्स होस्टेलचे उदघाटन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे त्यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते पण काल  जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीस पेक्षा अधिक जवानांचे प्राण गेले. या भ्याड हल्ल्याने देशात संतापाची लाट उसळली असून सर्वच स्तरावरून नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपला पुण्यातील नियोजित उदघाटन कार्यक्रम रद्द करून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहिली.

याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना मंत्री मुंडे म्हणाल्या अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा सामना आपल्याला मोठ्या मनोधैर्याने करावा लागेल. राजकारण , पक्ष ,विचार बाजूला ठेवून वज्रमुठी प्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीचा सामना केला पाहिजे.  ज्यांनी हा भ्याड हल्ला केला आहे त्यांना केंद्रातील सरकार आणि सुरक्षा यंत्रणा जशास तसे सडेतोड उत्तर देतील हा विश्वास मला असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्र प्रथम…कार्यक्रम रद्द करून श्रद्धांजली सभा घेण्याची केली आयोजकांना सूचना

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील वर्किंग वुमेन्स होस्टेलच्या उद्घाटनासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या प्रमुख पाहुण्या व उदघाटक म्हणून कार्यक्रमास निमंत्रित होत्या.परंतु  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देश  मोठ्या दुःखद घटनेला तोंड देत आहे .अशा परिस्थितीत कार्यक्रम घेणे हे आपल्या स्वभावात नसल्याचे सांगत पंकजा मुंडे यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रद्धांजली सभा घेण्याची सूचना आयोजकांना केली. तत्पूर्वी त्यांनी ट्विट करत स्वागत वगैरे टाळण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. यावेळी सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे, श्रीमती शर्मा, रूपाली बीडकर, विनोद मथुवाला आदी उपस्थित होते.

COMMENTS