विरोधी पक्षनेत्यांचा दुष्काळ दौरा म्हणजे वराती मागून घोडे, पंकजा मुंडेंची जोरदार टीका !

विरोधी पक्षनेत्यांचा दुष्काळ दौरा म्हणजे वराती मागून घोडे, पंकजा मुंडेंची जोरदार टीका !

बीड, परळी – जनतेची सेवा करण्यासाठी लोकनेते मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलयं. माझी शक्ती  मतदारसंघाला चांगले दिवस दाखविण्यासाठी आहे, त्यामुळे प्रतिस्पर्धी नेत्यांशी माझी तुलना वायफळ गोष्टी वरून करण्याऐवजी माझ्या चांगल्या कामाकडे पाहून करा असे सांगून राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या भागातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांनी दुष्काळी भागाचा केलेला दौरा म्हणजे वराती मागून घोडे असल्याची टीका त्यांनी केली.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी तालुक्यातील पौळ पिंपरी, कौडगांव साबळा, बेलंबा व गाढे पिंपळगांव येथे संपर्क दौरा करून दुष्काळ ग्रस्त जनतेशी संवाद साधण्याबरोबरच विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण केले त्यावेळी त्या बोलत होत्या. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत त्यांचा दौरा सुरू होता.

अमेरिका दौ-यावरून टीका करणारांचा त्यांनी आपल्या भाषणात खरपूस समाचार घेतला. ग्रामीण बचतगटांच्या महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना घेऊन मी अमेरिकेला गेले होते. दुष्काळाची भयानकता लक्षात घेवून दौ-यावर जाण्यापूर्वीच मी कांही गावांत गेले, शेतातील पिकांची पाहणी केली, शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या, एवढेच नव्हे तर शासकीय आढावा बैठकही घेतली व तसा अहवाल सरकारला सादर केला. माझ्या अहवालानंतर सरकारने सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. विरोधी पक्षनेत्यांना मात्र दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतक-यांची आठवण आली आणि त्यांनी दौरा सुरू केला, हे म्हणजे वराती मागून घोडे असल्याचा प्रकार आहे अशी टीका त्यांनी केली. दुष्काळाचे सावट गंभीर आहे, निसर्गाने पाठ फिरवली असली तरी  शेतक-यांच्या आम्ही पाठिशी आहोत असे त्या म्हणाल्या.

माझी शक्ती चांगल्या कामासाठी

काही जण प्रतिस्पर्धी नेत्यांशी माझी तुलना करतांना अनेक गोष्टी सांगतात पण एक महिला नेता म्हणून काम करतांना अनेक मर्यादा असतात. वायफळ गोष्टी करण्यापेक्षा जनतेला आरोग्य, पोषण व विकास देणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे, जनतेची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आलेयं, मेवा खाण्यासाठी नाही असे सांगत पंकजा मुंडे यांनी माझी तुलना मी केलेल्या चांगल्या कामाशी करा असे आवाहन केले. मी मतदारसंघात केलेली विकास कामे कुणाचे खिसे भरण्यासाठी केली नाहीत. विकासाचा निधी योग्य पध्दतीने खर्च व्हावा असा माझा आग्रह असतो त्यामुळे  भविष्याचा वेध घेतांना जनतेने याचा जरूर विचार करून मला आशीर्वाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण

दुष्काळग्रस्त जनतेशी संवाद साधण्याबरोबरच ना. पंकजाताई मुंडे यांनी या दौ-यात २५१५ योजनेतून सभागृह, रस्ते, आमदार, खासदार फंड, वॉटर फिल्टर, हायमास्ट दिवे, स्मशानभूमी आदी विकास कामांचा शुभारंभ व झालेल्या कामाचे लोकार्पण केले. पौळ पिंपरी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील एक कोटी ५६ लाख रुपयांच्या रस्त्याचे तसेच २५१५ मधून अंतर्गत रस्ते, सभागृह असे २६ लाख, कौडगांव साबळा येथे ३६ लाख रुपये कामाचे लोकार्पण व १५ लाखांच्या कामाचा शुभारंभ, गाढे पिंपळगांव येथे एक कोटी २१ लाख रुपयाचा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता, ३५ लाखांचे उद्घाटन व २४ लाख रूपयांच्या कामाचे लोकार्पण आणि बेलंबा येथे १ कोटी २९ लाख रुपयाच्या विकास कामांचा शुभारंभ व ६३ लाख रूपयांच्या कामाचे लोकार्पण त्यांनी केले.

कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नामदेवराव आघाव, जीवराज ढाकणे, रमेश कराड, वृक्षराज निर्मळ, सतीश मुंडे, सुरेश माने, रामेश्वर मुंडे, आश्रुबा काळे, प. स. सदस्य मोहन आचार्य, सरपंच इंदूमती गिते, किशोर गिते, सुधाकर पौळ, माऊली साबळे,  राजेश गिते, रवि कांदे, चंद्रकांत देवकते,  बिभीषण फड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS