पंकजा मुंडेंमुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर, ‘हे’ गाव परळी तालुक्यात समाविष्ट होणार !

पंकजा मुंडेंमुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर, ‘हे’ गाव परळी तालुक्यात समाविष्ट होणार !

बीड, परळी – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजा मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे धारूर तालुक्यातील खामगांव येत्या १ ऑगस्टपासून संपूर्णपणे परळी तालुक्यात समाविष्ट होणार असून तशी अंतिम अधिसूचना महसूल व वन विभागाने काढली आहे. या समावेशामुळे खामगांव ग्रामस्थांची मोठ्या गैरसोयीतून सुटका झाली आहे.

परळी तालुक्याच्या सीमेवर असणारे खामगांव हे गांव धारूर तालुक्यात होते. या गांवचे परळी पासूनचे अंतर २२ किमी असले तरी गांवचा स्वतःचा धारूर तालुका मात्र तब्बल ४५ किमी. अंतरावर होता, यामुळे ग्रामस्थांना शासकीय, निम शासकीय तसेच विविध दैनंदिन कामासाठी प्रचंड गैरसोय सहन करावी लागत होती. परळी तालुक्यात समावेश करावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून खामगांवचे ग्रामस्थ लढा देत होते. मध्यंतरी लोकनेते गोपीनाथराव मुंडे उप मुख्यमंत्री असतांना विभागीय आयुक्तां मार्फत त्यांनी खामगांवला परळीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केला होता व तसा प्रस्ताव देखील सादर केला होता. काॅग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात या मागणीकडे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला होता व ग्रामस्थ विविध अडचणींना तोंड देत होते.

पंकजा मुंडेंमुळे प्रश्न मार्गी

कांही महिन्यांपूर्वी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांची भेट घेवून याविषयी त्यांच्या समोर गा-हाणे मांडले आणि त्यानंतर त्यांनी संबंधित अधिका-यांना दिलेल्या निर्देशामुळे प्रशासकीय पातळीवर जोराच्या हालचाली सुरू झाल्या. यासंदर्भात शासनाच्या महसूल व वन विभागाने २८ नोव्हेंबर २०१८ रोजी अधिसूचना काढून धारूर व परळी तालुक्याच्या चतुःसिमामध्ये बदल केला व खामगांवला परळी तालुक्यात समाविष्ट केले, शासनाने आता ६ जून २०१९ रोजी यासंदर्भात अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करून येत्या १ ऑगस्टपासून खामगांव संपूर्णपणे परळी तालुक्यात समाविष्ट असेल असे नमुद केले आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी मंजूर करून देत मोठी गैरसोय दूर केल्याबद्दल गावक-यांनी पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.

COMMENTS