पंकजा मुंडेंच्या पोस्टर्सवर भाजपचं कमळ गायब!

पंकजा मुंडेंच्या पोस्टर्सवर भाजपचं कमळ गायब!

बीड – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे या गेली काही दिवसांपासून पक्षापासून दुरावल्या आहेत. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. अशातच आता पंकजा मुंडेंच्या पोस्टर्सवर भाजपचं कमळ गायब झालं असल्याचं दिसत आहे.

उद्या 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी उद्याच्या दिवशी स्वाभिमान दिवस असा नारा देत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. उद्याच्या कार्यक्रमानिमित्त लोकनेत्याला अभिवादन करणारे हजारो बॅनर्स परळी शहरात लावण्यात आले आहेत. मात्र यातील एकाही बॅनरवर भाजपचे चिन्ह नाही. तसेच मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेही नाहीत. त्यामुळे पंकजांनी खरंच वेगळा मार्ग निवडला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 12 डिसेंबरला 12 वाजता मेळाव्यास सुरुवात होणार असून विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे काय भूमिका घेतील यावर राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे उद्याच्या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS