सावरगामध्ये शक्ती प्रदर्शनातून ओबीसींची वज्रमुठ !

सावरगामध्ये शक्ती प्रदर्शनातून ओबीसींची वज्रमुठ !

बीड – राजकारणात आपला दबदबा कायम ठेवायचा असेल तर जनशक्ती सोबतच नेतृत्व गुण देखील आवश्यक असतात,आपण मास लीडर आहोत हे ओरडून सांगण्याऐवजी थेट दाखवून देण्यावर नेहमीच राजकारण्यांचा भर असतो,याचा प्रत्यय सावरगाव येथील दसरा मेळाव्यातून आला.साळी ,माळी ,कोळी,लिंगायत,ब्राम्हण ,शीख,मराठा  अशा सर्व संत महंतांची व्यासपीठावरील उपस्थिती आणि वंजारी पट्यातून निवडणूक लढवणाऱ्या आमदार,मंत्र्यांची हजेरी ही पंकजा मुंडे यांचे शक्तीप्रदर्शनाची झलक दाखवून गेली.हा मेळावा शक्तिप्रदर्शन नव्हे तर शक्तीचे दर्शन घडवण्यासाठी होता असा दावा पंकजा यांनी केला असला तरी मेळाव्याचे व्यासपीठ हे ओबीसींची वज्रमुठ आवळण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून गेले .

भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यावरून वाद झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या स्वभावाला काहीशी मुरड घालत दोन पावलं माग सरकत सावरगाव हे भगवान बाबांचं जन्मस्थळ आपल्या शक्तीप्रदर्शनाच ठिकाण निश्चित केलं .मात्र गतवर्षीचा मेळावा यशस्वी करून दाखवत त्यांनी आपण दोन पावलं माग सरकलो म्हणजे हार मानली नव्हती तर पुढे झेपावण्यासाठीची ती आपली रणनीती होती असाच संदेश  दिला होता .गतवर्षी घाई गडबडीत घेतलेल्या दसरा मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पंकजा मुंडे यांना उभारी देऊन गेला .त्यामुळे यावर्षीच्या दसरा मेळाव्याची तयारी महिना दीड महिन्यापासूनच सुरू होती .या ठिकाणी भगवान बाबांची भव्य 25 फुटाची मूर्ती आणि स्मारक तयार करून त्याचे लोकार्पण त्यांनी या मेळाव्यात केले .

या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार,कोणावर वार करणार,कोणाला इशारा देणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते .या मेळाव्यात कोणाकोणाला आमंत्रित करायचे,व्यासपीठ कसे असेल,स्मारक कसे असेल,कोण केव्हा ,कधी भाषण करेल या सगळ्या गोष्टीवर पंकजा मुंडे स्वतः लक्ष ठेवून होत्या,एवढंच नाही तर मेळाव्यातून नेमका कोणावर निशाणा साधायचा हे देखील त्यांनी आधीच ठरवलं होतं की काय असं कार्यक्रमानंतर वाटून गेलं .

वाघाच्या पोटी वाघीणच जन्म घेणार ना असं लोकांना विचारत त्यांनी हो मी वाघीणच आहे अशी ललकारी देत आपल्या भाषणात विरोधी पक्षासोबतच स्वपक्षीयाना देखील आपली ताकद दाखवून दिली. “तू दबे पाव चोरी छुपे ना आणा,सामने से वार कर फिर मुझे आजमाना “असे म्हणत त्यांनी एकीकडे आपल्या विरोधकांना आव्हान दिलं तर दुसरीकडे कागदी सर्व्हे करून तिकीट दिल जात नसत तर माणसं पाहून तिकीट दिलं जात असे म्हणत स्वपक्षीयाना देखील इशारा दिला आहे .सावरगाव च्या मेळाव्याच वैशिष्ठ म्हणजे या मेळाव्यात व्यासपीठावर संत महंत आणि राजकारणी मोठ्या प्रमाणात दिसून आले .साळी, माळी, ब्राम्हण,लिंगायत अशा सगळ्या छोट्या छोट्या जाती समूहातील महाराज आणि संतांना व्यासपीठावर विशेष स्थान देण्यात आलं होतं .

राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार पंकजा मुंडे यांचा हा मास्टरस्ट्रोक आहे .कारण राज्यात भारतीय जनता पक्षात सध्या ओबीसी समाजाच नेतृत्व करण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याशिवाय दुसरं कोणतंच नाव नाही,त्यामुळेच की काय त्यांनी मी कोणत्याही पदाची लालसा ठेवत नाही तर मी किंगमेकर आहे आणि राहू इच्छिते अस सांगत आपल्या भविष्यातील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .

गोपीनाथ मुंडे यांनी भाजप मध्ये असताना देखील छगन भुजबळ यांच्यासोबत मैत्री कायम ठेवत ओबीसींची ताकद आपल्या पाठीशी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता ,आता पंकजा यांनी देखील हाच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न चालविला आहे .सावरगाव येथे केवळ वंजारी समाजातीलच लोक हजर होते असे नाही तर विविध जातीचे लोक उपस्थित होते, नव्हे ते येतील याची देखील काळजी घेतली होती असे म्हणायला हरकत नाही .

मंत्री राम शिंदे असोत की आमदार कर्डीले,राजळे,मुरकुटे अथवा बीड जिल्ह्यातील धोंडे,धस,ठोंबरे,पवार या सगळ्याच आमदारांची उपस्थिती हेच दाखवून देत होती की आगामी लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून सावरगावातून पंकजा यांनी ओबीसींची वज्रमुठ आवळत आपल्या ताकदीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करीत शंखनाद केला आहे .

दरवर्षी गोपीनाथ मुंडे यांना भगवान गडावरून मुंबई आणि दिल्ली दिसायची आणि ते स्पष्टपणे याची जाहीर कबुली द्यायचे ,त्याच प्रमाणे पंकजा यांना सावरगाव च्या मेळाव्यातून काही न काही तरी  दिसलं असेलच मात्र  हे त्यांनी सांगितलं नसलं तरी कुठं ना कुठं निश्चितच त्यांना सावरगावातून ‘वर्षा’ दिसलं असेल हे नक्की . गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे वर्षावर जाण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. आता त्यांचं अधुरं स्वप्न पंकजा पूर्ण करणार का याकडं त्यांच्या समर्थकांचं लक्ष लागलं आहे.

विशेष म्हणजे या मेळाव्यातील त्यांचा वावर हा प्रचंड आत्मविश्वास असल्यासारखा होता.सभेत घोषणाबाजी करणाऱ्या लोकांना मध्येच दरडावून बोलणे असो की सभेला व्यासपीठावर आल्याबरोबर उपस्थित जनसमुदायाचे घेतलेले दर्शन असेल पंकजा मुंडे यांनी निवडणुका जवळ आल्या आहेत आणि जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हेच दाखवून दिले .

 

लक्ष्मीकांत रुईकर, बीड

9422744404

COMMENTS