“टीपी मुंडे गेल्याने काय फरक पडणार, परळीत काँग्रेस मजबूतच,” धनंजय मुंडेंसाठी काँग्रेस नेते एकवटले!

“टीपी मुंडे गेल्याने काय फरक पडणार, परळीत काँग्रेस मजबूतच,” धनंजय मुंडेंसाठी काँग्रेस नेते एकवटले!

बीड, परळी – काँग्रेस पक्ष हा महासागरासारखा आहे, या पक्षातून एखादा नेता किंवा काही कार्यकर्त्यांनी स्वार्थासाठी पक्षांतर केले तरी, काँग्रेसला त्याचा काहीच परिणाम होणार नाही. परळीतील काँग्रेस आजही मजबुत असून, आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विजयाचा आम्ही निर्धार केला असून, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

एकीकडे परळी शहरातील काही कार्यकर्ते आज भाजपामध्ये प्रवेश करत असतानाच दुसरीकडे शहरातील निष्ठावंत काँग्रेसचे असणारे नेतेमंडळी भारत सरकारच्या श्रम व रोजगार नाशिक विभागाचे चेअरमन वसंतराव मुंडे यांच्या निवासस्थानी एकत्र आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे सरचिटणीस बाळासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष बाबु नंबरदार हे होते.

या बैठकीस ज्येष्ठ नेते जी.एस.सौंदळे, गणपतअप्पा कोरे, विजयप्रकाश अवस्थी, सलिम खान, लहुदास तांदळे, सय्यद अल्ताफ शेख सिकंदर, नरेश हालगे, थोन्टे अप्पा, जब्बार सेठ, सय्यद अहेमद, विश्वनाथ गायकवाड, आशाताई कोरे, शेख महेमूद, फरकून अली बेग आदींसह प्रमुख पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी डॉ.सुरेश चौधरी, बाळासाहेब देशमुख, जी.एस.सौंदळे, वसंत मुंडे यांनी आपले विचार व्यक्त करताना स्वार्थासाठी पक्ष सोडणार्‍यांचा पक्षावर काहीच परिणाम होणार नाही. परळी हे काँग्रेस विचारसरणीचे शहर असून, या शहराने नेहमीच पुरोगामी विचारांच्या मंडळींना साथ दिली आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीमध्ये सुटला असल्याने आघाडी धर्माचे प्रामाणिकपणे पालन करत या मतदारसंघाच्या विकासासाठी झटणार्‍या धनंजय मुंडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

 

COMMENTS