परभणीत राष्ट्रवादीला धक्का, 13 नगरसेवकांनी पुकारले बंड !

परभणीत राष्ट्रवादीला धक्का, 13 नगरसेवकांनी पुकारले बंड !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. परभणी महापालिकेतील 18 पैकी 13 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे परभणी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्वीकृत नगरसेवक कै. विष्ण नवले पाटील यांच्या रिक्त पदावरुन हा वाद वाढला असल्याची माहिती आहे. बाबाजानी दुर्राणी हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच माहापालिकेतील स्वीकृत नगरसेवक विष्ण नवले पाटील याचे निधन झाले आहे. त्यांच्या या रिक्त पदावर त्यांच्या पत्नी प्रणिता पाटील यांचे नाव देण्याची मागणी या नगरसेवकांनी केली. त्यानुसार प्रणिता नवले यांनी उमेदवारी अर्जही भरला. परंतु ऐनवेळी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांच्याऐवजी अतिक इनामदार यांचे नाव समोर ठेवले. त्यामुळे या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत.

COMMENTS