“त्या” ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना खासदाराने शहरप्रमुखाला बदडले ?

“त्या” ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना खासदाराने शहरप्रमुखाला बदडले ?

परभणी – शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी ताडकळसचे शहरप्रमुख बालाजी रुद्रावार यांना घरी बोलवून मारहाण केली आहे. या प्रकरणी संजय जाधव यांच्याविरोधात नानलपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय जाधव यांनी आपल्याला घरी बोलावून मारहाण केल्याचा आरोप बालाजी रुद्रावार यांनी केला आहे. या मारहाण प्रकरणामुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

बालाजी रुद्रावर यांची एक ऑडिओ क्लिप खासदारांच्या हाती लागली असल्याचं बोललं जातंय. त्या ऑडिओ क्लिपमध्ये बालाजी रुद्रावार हे आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार संजय जाधव यांचं काम करणार नाही असं म्हणत आहेत. याचा राग मनामध्ये धरुन खासदार संजय जाधव यांनी रुद्रावार यांना त्यांच्या घरी बोलावून घेतलं. आणि घरामध्येच मारहाण केल्याचा आरोप रुद्रावार यांनी केला आहे. ताडकळस हे पूर्णा तालुक्यातील मोठे गाव आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गाव परिचित आहे. त्यामुळे गाव असूनही त्याला शहरप्रमुख पद दिले गेले आहे.

या मारहाण प्रकरणाला शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीची किनार असल्याचं बोललं जातंय. जिल्ह्यात शिवसेनेत सध्या खासदार संजय जाधव विरुद्ध परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्यातील वाद चर्चेचा विषय आहे. दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नाही. राहुल पाटील यांनी जिल्ह्यात खाजगी महाविद्यालय आणलं आहे. मात्र जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवे अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे. विरोधी पक्षातील सर्व आमदारांचीही या प्रकरणी संजय जाधव यांना पाठिंबा आहे. सर्वांनी मिळून नुकतीच आरोग्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांच्याकडे शासकीय महाविद्यालय देण्याची मागणी केली आहे. खासदार आमदारांमधील वादाचा फटका आगामी निवडणुकीत शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.

COMMENTS