भाजपमधला अंतर्गत वाद वाढला, पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे गटाला धक्का !

भाजपमधला अंतर्गत वाद वाढला, पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे गटाला धक्का !

पिंपरी – चिंचवड – महापालिकेतील भाजपमधला अंतर्गत वाद वाढला असल्याचं दिसून येत आहे. महेश लांडगे गटाचे महापौर नितीन काळजे यांनी अध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन काळजे यांनी नाराज होऊन आपाला राजीनामा सोपवला आहे. या गटबाजीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकवटली असल्याचं पहावयास मिळालं आहे. शहराध्यक्ष आणि लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक सीमा सावळे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर स्थायीचं अध्यक्षपद आमदार महेश लांडगे गटाला देणं अपेक्षित होतं. परंतु इच्छुकांची गर्दी वाढल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी जगताप गटाच्या ममता गायकवाड यांना स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं आहे. यामुळेच नाराज लांडगे समर्थक महापौर नितीन काळजे यांनी शहराध्यक्ष जगतापांकडे तर स्थायीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी स्थायीच्या सदस्यपदाचे राजीनामे सभागृह नेत्यांकडे सोपविले आहेत.

दरम्यान पक्षाच्या हितासाठी माझ्यासह सर्वांचे राजीनामे तयार असून, आमच्यासाठी राजीनामे ही दुय्यम गोष्ट असल्याचं महापौर काळजे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपमधला अंतर्गत वाद वाढला असल्याचं दिसत आहे. तसेच भाजपमधील या अंतर्गत वादाजा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना घेत असल्याचं दिसून येत आहे. कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर मोरेश्वर भोंडवे यांनी स्थायीच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच सध्याची परिस्थिती पाहता अध्यक्ष आमचाच असणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

 

COMMENTS