आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार ?

आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.याबाबत फेब्रुवारी अखेरपर्यंत तयारी करण्याचे आदेशही केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्याच्या निवडणूक आयोगांना दिले असल्याची माहिती आहे. लोकसभेचा कार्यकाळ येत्या 3 जूनपर्यंत संपणार आहे. त्यामुळे या निवडणुका किती टप्प्यात घ्यायच्या याबाबत निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक तयार केलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान 2004 मध्ये निवडणूक आयोगाने 29 फेब्रुवारीला लोकसभा निवडणुकीची घोषणा केली होती. चार टप्प्यात हे मतदान घेण्यात आलं होतं. त्यावेळी 20 एप्रिल ते 10 मे पर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरु होती. तर 2009 मध्ये निवडणूक आयोगाने 2 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली होती. पाच टप्प्यांत हे मतदान घेण्यात आलं होतं. त्यावेळी 16 एप्रिल ते 13 मे पर्यंत मतदान प्रक्रिया चालली होती.

तसेच मागच्या वेळी म्हणजेच 2014 मध्ये निवडणूक आयोगाने 5 मार्च रोजी निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यावेळी नऊ टप्प्यात हे मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यात मतदान 7 एप्रिल रोजी होते, तर शेवटचा टप्पा 12 मे रोजी पार पडला. त्यामुळे आगामी निवडणुकीची घोषणाही 5 मार्चपर्यंत केली जाऊ शकते असं बोललं जात आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू करण्यात आली असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर राजकीय पक्ष देखील निवडणुकीच्या तयारीला लागले असून राज्यात भाजप-शिवसेनेत युतीची आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीची चर्चा सुरू आहे.

शिवसेनेनं आधीच स्वबळाचा नारा दिला आहे. तर भाजपकडून युतीसाठी मनधरणी सुरू आहे. अशातच निवडणूक आयोगाने एकत्र निवडणूक घेण्याच्या शक्यता वर्तवली होती. जर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र, झाल्या तर राज्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर शिवसेनेला याचा फायदा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे भाजपकडून नमती भूमिका घेतली जात असल्याचंही बोललं जात आहे.

COMMENTS