भाजप आणि आरएसएसच्या चुकीच्या धोरणामुळे,  रुपयाची मोठ्याप्रमाणात घसरण – प्रकाश आंबेडकर

भाजप आणि आरएसएसच्या चुकीच्या धोरणामुळे, रुपयाची मोठ्याप्रमाणात घसरण – प्रकाश आंबेडकर

मुंबई – भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा सरकारच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चुकीच्या धोरणामुळे रुपयाची मोठ्याप्रमाणात घसरण झाली असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच रुपया घसरतोय त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे भाजपाने या उद्योगपतींचा छळ सुरू केला असून काही जणांची माहिती काही जणांना दिली जातेय, त्यातून उद्योगांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान 50 कोटी पेक्षा जास्त संपत्ती अससेले कुटुंब त्यामुळे स्थलांतर करत असून 3 लाख 30 हजार कुटुंबियांपैकी 75 हजार कुटुंबांनी स्थलांतर केलं असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ही कुटुंब देशाच्या 50 टक्के संपत्तीचा मालक आहेत. तो आपली संपत्ती विकतो आहे. त्यातून आलेले रुपयांचं डॉलरमध्ये रुपांतर करून तो स्थलांतरित होत असून आपल्याला अटक होऊ नये किंवा कुठल्या कायदेशीर कचाट्यात अडकू नये म्हणून तो भारतातून पलायन करत असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

तसेच आयातही होत नाही आणि निर्यातही होत नाही अशी आजची स्थिती आहे. एफडीआयमध्ये पैसा येत होता तोही बंद झाला आहे. एप्रिल 2018 ला एप्रिल 2018 ला फॉरेन एक्स्चेंज 426 कोटी डॉलर होते ते जून 2018 ला 380.7 कोटी डॉलरवर खाली आले आहेत. तसेच या देशातील 50 हजार कोटी रुपये डॉलरमध्ये रुपांतरीत केले जाऊ शकतील. असं झालं तर डॉलरची किंमत 100 रुपयांपर्यंत जाऊ शकते अशी माहितीही प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

तसेच यापूर्वी ही कुटुंब आपली संपत्ती विकत नव्हती पण आता विकत आहेत आणि स्थलांतर करून दुसर्‍या देशाचे नागरिकत्व घेत आहेत. याला भाजपा सरकारचे आणि संघाचे धोरण कारणीभूत आहे. यात बहुतांश हिंदू आहेत, त्यामुळे भाजपा आणि संघ हे हिंदुविरोधी आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूला एकाच वेळी धोका निर्माण झाला असून आयात झाल्यामुळे सोनं गहाण ठेवावं लागतं का काय अशी स्थिती आहे, तर दुसरीकडे उद्योजक या देशातून पलायन करत आहेत. त्यामुळे हे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर 3 लाख 30 हजार 400 कुटुंब आहेत. त्यापैकी भारतात किती राहतील त्याबाबत शंका असल्याचं वक्तव्यही प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

 

COMMENTS