मोहन भागवतांच्या भाषणाचा प्रकाश आंबेडकरांनी लावलेला अर्थ !

मोहन भागवतांच्या भाषणाचा प्रकाश आंबेडकरांनी लावलेला अर्थ !

मुंबई – आरएसएसच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेत मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणावर प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या व्याख्यानमालेमध्ये मोहन भागवत यांनी लोकांना पुन्हा फसवण्यासाठी आणि आम्ही बदललो आहोत हे दाखवण्यासाठी इतर पक्षाच्या नेत्यांना बोलवलं होतं असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. तसेच माझ्याकडे गोळवलकर गुरुजींचे पुस्तक आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा आणि म्हाळगी प्रबोधिनीत हे पुस्तक अभ्यासासाठी आहे.  व्हू ऑर अवर नॅशनलहूड असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकातील मजकुराबाबत संघ अथवा भागवतांनी खंडन केलेलं नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आम्ही सहनशील आहोत. अल्पसंख्याकांनी एकरुप होत असताना स्वतःची संस्कृती, भाषा, संपवली पाहिजे आणि हिंदू हाच धर्म म्हणून स्वीकारला पाहिजे. यांनी संविधानाची तत्व स्वीकारलेली नाहीत. संघाचे बायबल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकात तेच नमूद करण्यात आलं असून मोहन भागवत यांनीही हीच डेंजर थेअरी मांडली असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आर्यन थेअरीप्रमाणे आम्ही सर्वोच्च आहोत अशी संघाची भूमिका आहे. संघ देशातील कोणत्याही कायद्याला मानत नाहीत. संघ ही नोंदणीकृत संस्था नसल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सरदार पटेल आणि गोळवलकर गुरुजी यांच्यात जो करार झाला त्यात पहिली अट होती की संघ 15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र दिन म्हणून साजरा करतील काळा दिवस पाळणार नाहीत. तसेच देशाचे संविधान ते मान्य करतील ही दुसरी अट तसेच देशाचे राष्ट्रगीत जन गण मन हे या करारानुसार संघाने मान्य केले असून  26 जुन 1949 रोजी हा करार करण्यात आला. या करारानंतर संघाच्या लोकांची सुटका करण्यात आली.

त्यामुळे माझा प्रणव मुखर्जी आणि संघाच्या कार्यक्रमात गेलेल्या लोकांना सवाल आहे की संघाला आज हे सगळे मान्य आहे का?, संघाने वंदे मातरम ऐवजी जन गण मन हे राष्ट्रगीत मान्य केले आहे का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. तसेच भागवत यांनी गोळवलकर गुरुजी यांची थिअरीच आपल्या भाषणात मांडली आणि आम्ही त्याचा निषेध करत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

COMMENTS