भाजप-मनसेची मैत्रीपूर्ण भेट

भाजप-मनसेची मैत्रीपूर्ण भेट

मुंबई – महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेगानं घडताना दिसत आहे. शिवसेना दूर गेल्यानंतर मुंबई महापालिकेत भाजपा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा होत असतानाच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आमदार प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपा-मनसेची रणनीती असू शकते. येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. त्यानिमित्ताने ही भेट तर नाही ना असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. प्रसाद लाड हे जवळपास पाऊण तास राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर होते. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.

पण, भेटीनंतर कृष्णकुंजमधून बाहेर पडल्यानंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. “भारतीय जनता पार्टीचा निर्धार मुंबई महापालिकेवर पक्षाचा झेंडा,” अशी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्यासोबतची भेट ही वैयक्तिक होती, माझे आणि राज ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध आहेत, असं प्रसाद लाड म्हणाले. मात्र त्याचबरोबर “शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी जे करता येईल ते करु,” म्हणत लाड यांनी शिवसेनेला इशाराही दिला.

COMMENTS