लाईफ इज ब्युटीफुल, रॉबर्ट बेनीनी आणि मी, करोनाशी हसत खेळत कसे जिंकाल?, वाचा डॉ. प्रशांत भामरेंची आणखी एक पोस्ट!

लाईफ इज ब्युटीफुल, रॉबर्ट बेनीनी आणि मी, करोनाशी हसत खेळत कसे जिंकाल?, वाचा डॉ. प्रशांत भामरेंची आणखी एक पोस्ट!

मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे खासगी सचिव डॉ. प्रशांत भामरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. घाबरुन न जाता करोनाशी हसत खेळत कसं जिंकायचं याबाबतची आणखी एक पोस्ट भामरे यांनी केली आहे. यामध्ये त्यांनी आणखी एक कथा सांगितली आहे.

डॉ. प्रशांत भामरे यांची फेसबुक पोस्ट

#लाईफ_इज_ब्युटीफुल,#रॉबर्ट_बेनीनी_आणि_मी.

सन 1998 साली लाईफ इस ब्युटीफुल हा चित्रपट आला होता. मी आणि माझा बालमित्र राहुल आम्ही त्याची पारायणं केली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभुमीवर आधारित हा चित्रपट होता. हिटलर आणि नाझींच्या छळ छावण्या, तिथे झालेले अनन्वित अत्याचार, लाखो ज्यूंचं झालेलं हत्याकांड यावर बरेच चित्रपट येऊन गेलेत ( त्यांना होलोकास्ट मुव्हीज म्हणतात ) आणखीनही येत राहतील.

पण या चित्रपटाचं वेगळेपण असं होत की यात होलोकास्ट हा विषय विनोदी ढंगाने सादर केला होता आणि तरीही आशयातलं क्रौर्य अजिबात कमी झालं नव्हतं.

कथानक थोडक्यात असं होतं की चित्रपटाचा नायक गुइडो ( रॉबर्ट बेनीनी ) हा ज्यु असतो, नाझिंचे ऑस्ट्रियात अत्याचार ( आणि दुसरं महायुद्ध ) सुरु होण्यापुर्वीच तो इटलीत आपल्या काकांकडे निघुन येतो. काकांचं एक हॉटेल असतं त्यात तो काकांना मदत करायला सुरुवात करतो. तिथे तो एका इटालियन ख्रिश्चन मुलीच्या प्रेमात पडतो, तिला पटवतो आणि चक्क तिच्या लग्नाच्या मंडपातून तिला घोड्यावर बसवून पळवून नेतो आणि लग्न करतो. एक पुस्तकांचं दुकान थाटतो. त्यांना एक मुलगा होतो ( गुईजो ),

मुलगा साधारणतः चार वर्षाचा असताना तिथे नाझींचं आगमन होतं आणि खरा चित्रपट तिथुन सुरु होतो ( त्याआधीच चित्रपट निखळ विनोदी ढंगाचा आहे ).

नाझी आपलं विखारी धोरण तिथे राबवायला सुरुवात करतात, ज्यु कुटुंब, त्यांचे व्यवसाय यांच्या स्वतंत्र नोंदी घ्यायला सुरुवात होते. लोक हॉटेल, दुकानं याठिकाणी बोर्ड लावतात ‘ज्युज अँड डॉग्स नॉट अलाऊड’. असाच एक बोर्ड वाचुन छोटा गुईजो आपल्या बापाला विचारतो डॅडी हे असं का लिहिलंय ? सभोवतालच्या भयानक अमानवीय वातावरणाचा अर्थ जर या बालमनाला कळला तर हा पोरगा कधीही चांगला माणुस होऊ शकणार नाही या धारणेतुन गुइडो त्याला विनोदी वळण देतो, म्हणे असा बोर्ड लावायचा आता सरकारने कायदा केला आहे आणि एक प्राणी आणि एक समुह याना प्रवेश नाही असा बोर्ड लावावा लागतो. तो आणखी त्याचा विश्वास बसावा म्हणुन पोराला विचारतो आपल्या दुकानावर काय बोर्ड लावायचा ? मग ‘spiders or Visigoths are not allowed.’ असा बोर्ड लावायचं ठरत.

पण ज्यादिवसाची भीती असते तो दिवस उजाडतोच, छोट्या गुईजोचा वाढदिवस असतो, त्याने बापाला मला रणगाडा गिफ्ट म्हणुन हवा आहे असा हट्ट धरलेला असतो, घरात अत्यंत उत्सवी वातावरण असतं आणि अचानक हिटलरचे गेस्टापो येतात त्यांना छळछावणीत घेऊन जाण्यासाठी. आणि मग सुरु होते गुइडोची खरी धडपड, एका बाजुला त्याला आपल्या मुलाचा जीवही वाचवायचा आहे आणि त्याला समजूही द्यायचं नाहीये कि आपण छळछावणीत आहोत, इथे लहान मुलांना आणि वृद्धांना गॅस चेंबर मध्ये घालुन मारतात, मोठ्यांचा जीव जाईपर्यंत त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं आणि क्षुल्लक चुकीवरून किंवा चूक नसतानाही निव्वळ गेस्टापोला वाटलं म्हणुन गोळी घातली जाते.

छळछावणीत पहिल्याच दिवशी गुईजोचे आजोबा गॅस चेंबरमध्ये मरतात, छोटा गुईजो नशिबाने वाचतो कारण त्याला अंघोळीचा प्रचंड कंटाळा असतो म्हणुन जेव्हा गेस्टापो सर्वांनी अंघोळीला चला म्हणुन बोलवायला येतात तेव्हा तो लपुन बसतो. ( गॅस चेम्बरची रचना सार्वजनिक स्नानगृहासारखी असायची आणि लोकांना अंघोळीच्या नावाखाली त्यात कोंबुन मारलं जायचं ).

त्याच्यावरून गुइडोला एक भन्नाट आयडिया सुचते आणि त्यामुळे दोन्ही कामं होऊन जातात. तो छोट्या गुईजोला सांगतो कि आपल्याला इथे एक गेम खेळायला आणलं आहे, आपण लपुन राहायचं आणि गेस्टापो आपल्याला शोधत राहणार पण आपण सापडायचं नाही, जो लहान मुलगा शेवटपर्यंत सापडणार नाही त्याला रणगाडा बक्षीस म्हणुन दिला जाणार आहे. मग सुरु होतो एक ( एकाचवेळी ) थरारक, भीतीदायक आणि विनोदी खेळ.

सरते शेवटी जेव्हा दोस्तांच्या फौजा जवळ पोहोचतात तेव्हा नाझी त्या कॅम्पची आवराआवर सुरु करतात. त्या रात्री गुइडो गुईजो ला सांगतो कि आता गेम संपत आलाय, तुला सर्वात जास्त पॉईंट मिळालेत आणि तुला रणगाडा बक्षीस मिळणार आहेत म्हणुन तुला गेस्टापो डिस्पेरेतली शोधात आहेत. तो त्याला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका स्वेटबॉक्स मध्ये लपवतो आणि सांगतो कि जेव्हा सर्व आवाज थांबतील, काही तास पुर्ण शांतता असेल आणि नंतर जो आवाज येईल तेव्हाच या पेटीच्या बाहेर ये, तोपर्यंत काहीही झालं तरी बाहेर यायचं नाही.

रात्रीची वेळ असते, बाहेर भयानक कत्लेआम चालु असतो, नाझी दिसेल त्याला गोळ्या घालत असतात, कागदपत्रे पुराव्यांची जाळपोळ सुरु असते, प्रचंड गोळीबाराचे आवाज येतात, पण गुईजो पेटीतून बाहेर येत नाही. इकडे गुइडो गुईजोला लपवल्यानंतर आपल्या बायकोच्या शोधात निघतो, दुर्दैवाने त्याला गेस्टापो पकडतात आणि गोळी मारण्यासाठी घेऊन जातात, जेव्हा ते स्वेटबॉक्ससमोर येतात तेव्हा गुइडो विचित्र अंगविक्षेपकारुन परेड केल्याच्या अविर्भावात चालतो जेणेकरून स्वेटबॉक्समधून पाहणाऱ्या गुईजोला हा खेळ आहे असं वाटलं पाहिजे.

इमॅजिन करा 5 मिनिटांनंतर 100 टक्के मृत्यु येणार आहे अश्या परिस्थितीतसुद्धा तो आपला ह्युमर गमावत नाही.

मग रात्री उशिरा कधीतरी सर्व आवाज बंद होतात( नाझी छळछावणी सोडुन निघुन जातात ) सकाळ होते आणि दुरवरुन काही आवाज यायला सुरुवात होते. छोटा गुईजो आपल्या बापाने सांगितल्याप्रमाणे स्वेटबॉक्समधून बाहेर येतो आणि रस्त्याच्या मधोमध कंबरेवर हात ठेऊन आवाजाच्या दिशेने कोणी येतंय का ? दिसतंय का ? म्हणुन बघत उभा राहतो. सर्वत्र शुकशुकाट असतो, त्याच्या समोरच्या रस्ता एक ठिकाणी जाऊन काटकोनात वळतो म्हणुन तिकडंच दिसत नाही पण दुरवरून आवाज येत असतात. अशीच तीस चाळीस सेकंद जातात आणि अचानक समोरच्या रस्त्यावरून काटकोनात वळुन एक अमेरीकन रणगाडा हळुहळु पडद्यावर अवतरताना दिसतो.

छोट्या गुईजोचा आनंद गगनात मावेनासा होतो, त्याचा विश्वासच बसत नाही कि आपण खरंच गेम जिंकलोय आणि आपल्याला खराखुरा रणगाडा बक्षीस म्हणुन मिळालाय. ( त्याचा तसा समज होतो ). रणगाडा जवळ आल्यावर रस्त्याच्या मधोमध हे कोण महाशय उभे आहेत म्हणुन रणगाडा उभा राहतो, त्यातुन एक अमेरिकन सैनिक डोकं बाहेर काढतो आणि त्याला गुईजो सांगतो धिस इस माय टॅंक. सैनिक त्याला उचलुन घेतो, पुढे त्याची आई भेटते, तिला बिलगुन गुईजो म्हणतो ‘ Mama we won ‘
आणि ते सर्वार्थाने खरें असते.

मला या चित्रपटातुन जे मिळालं ते असं कि कोणतीही परिस्थिती असो, संकट कितीही गंभीर असो त्याचा बाऊ न करता त्याला हसतखेळत समोर गेलं पाहिजे. आपल्या परिस्थितीचा आपल्या कुटुंबियांवर, निकटवर्तीयांवर विपरीत परिणाम न होऊ देण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपल्या हातात फक्त कृती करणे एव्हढेच आहे, प्रत्येक प्रसंगातुन जात असताना आवश्यक त्या कृती करण्याव्यतिरिक्त आपण इतर सर्व जे काही करतो, उदाहरणार्थ मलाच का देवा हा त्रास ? माझ्यावरच का हा प्रसंग यावा ? मी काय वाईट केलंय ? माझं नशीबच खराब आहे, अमक्याने असं केलं असत तर असं झालं नसतं, राग, त्रागा, चिडचिड, संताप वगैरे, ते सर्व आपल्याला आणि आपल्या सभोवतालच्या लोकांच्या अडचणीत वाढ करणारेच असते. We suffer more in our imagination rather than in reality.

खलील जिब्रान म्हणतो त्याप्रमाणे निसर्गात फक्त ‘Causes आणि Actions’ असतात त्याव्यतिरिक्त आपण जे काही करतो ती फक्त अवांतर अनावश्यक आणि त्रास वाढवणारी स्टोरी असते ….

म्हणुन टेस्ट पॉसिटीव्ह आल्याक्षणी आम्ही ( मी आणि माझा ज्युनिअर प्रशांत जोशींनी ) ठरवलं ” कोरोना मै आ राहा हु ” #थँक_यु_रॉबर्ट_बेनीनी_सर.

#डॉ_प्रशांत_भामरे

#कोरोनायुद्ध

#लढा

#बॉम्बे_हॉस्पिटलच्या_कोविड_वॉर्डातून

दि. 15 / 06 / 2021

https://m.facebook.com/story.php?story_fbid=276715837014072&id=100040269725362

COMMENTS