…तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही – राहुल गांधी

…तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली – आरएसएस आणि भाजपाच्या मनुवादाच्या विषारी राजकारणाविरोधात जर आपण आवाज उठवला नाही तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही  असं ट्विट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. जळगावमध्ये घडलेल्या घटनेवर राहुल गांथी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आंघोळ करुन विहीर बाटवली म्हणून मातंग समाजातील दोन मुलांची नग्न धिंड काढून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली होती. जळगावमधील वाकडी येथे ही घटना घडली असून या घटनेचे पडसाद आता देशभर उमटले असल्याचं दिसत आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील या दलित मुलांचा गुन्हा केवळ ‘सवर्ण’ समाजाच्या विहिरीत आंघोळ केल्याचा आहे. त्यामुळे त्यांना अशापद्धतीने मारहाण करणे ही बाब योग्य नसून माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचंह राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  या प्रकरणी ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार या दोघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सचिन चांदणे व राहुल चांदणे या मातंग समाजातील तरुणांनी ईश्वर बळवंत जोशी यांच्या शेतातील विहिरीवर पोहले होते. या कारणावरुन जोशी व प्रल्हाद लोहार यांनी या मुलांना अमानुष मारहाण करत त्यांची गावातून नग्न धिंड काढली. या प्रकाराची वाच्यता करू नये, म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

 

COMMENTS