राहुल गांधींच्या विमानात संशयास्पद हालचाली, तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ !

राहुल गांधींच्या विमानात संशयास्पद हालचाली, तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ !

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आज कर्नाटकाच्या प्रचार दौ-यावर होते. राहुल गांधी गुरुवारी दिल्लीहून हुबळी असा विमान प्रवास केला. प्रवासादरम्यान विमानात अत्यंत संशयास्पद हालचाली झाल्या आणि हे प्रकरण गंभीर असल्याची तक्रार या विमानातून प्रवास करणारे कौशल विद्यार्थी यांनी केली आहे. विद्यार्थी यांनी कर्नाटक पोलिसांकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. दरम्यान काँग्रेसनंही या प्रकरणी विमानतळ प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. दरम्यान या प्रकरणी पायलटची चौकशी करण्यात येत असल्याचंही वृत्त काही इंग्रजी वर्तमानपत्रांनी दिलं आहे. तसंच पायलट विरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचंही वृत्त आहे.
‘मी दिल्लीतून कर्नाटकातील हुबळीला जाणाऱ्या विशेष विमानाने प्रवास केला. माझ्यासोबत आणखी ४ प्रवासी होते. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, रामप्रीत, राहुल रवी, राहुल गौतम (एसपीजी अधिकारी) या चौघांचा समावेश होता. विमानाने सकाळी साधारण ९.२० च्या सुमारास दिल्ली विमानतळावरून उड्डाण केले. नियोजित वेळेनुसार ते विमान सकाळी ११.४५ वाजता हुबळी विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. मात्र, या प्रवासादरम्यान अनेक अनपेक्षित आणि संशयास्पद प्रकार घडले’, असे कौशल यांनी तक्रारीत म्हटले आहे.   १०.४५ च्या सुमारास विमान अचानक एका बाजूला झुकले आणि खाली आले. यादरम्यान, विचित्र आवाजही झाला. विमानातील ‘ऑटो पायलट मोड’ निकामी झाल्याचेही त्यावेळी लक्षात आले. हवामान सामान्य असतानाही असा प्रकार घडल्याने सगळेच चक्रावून गेले, असेही कौशल यांनी तक्रारीत म्हटले आहे. विमान हुबळीजवळ गेल्यानंतर विमान उतरवण्याचे दोन प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात विमान उतरले. हा सगळाच प्रकार संशयास्पद होता, असे कौशल यांनी तक्रारीत म्हटले आहे.

COMMENTS