वृक्षारोपण कार्यक्रमाकडे रायगडमधील खासदार, आमदारांनी फिरवली पाठ !

वृक्षारोपण कार्यक्रमाकडे रायगडमधील खासदार, आमदारांनी फिरवली पाठ !

अलिबाग – राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम अलिबाग तालुक्यातील कार्ला येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित रहाणार होते; परंतु या कार्यक्रमाकडे चक्क सत्ताधारी भाजप, शिवसेना खासदार, आमदारांसह विरोधी पक्षांतील आमदारांनीही पाठ फिरवल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यातील एकाही आमदाराला या मुख्य कार्यक्रमासाठी वेळ मिळाला नाही का, अशी चर्चा लोकांमध्ये आहे.

राज्य शासनाच्या वनविभागातर्फे 13 कोटी वृक्षलागवड अभियान राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील या अभियानाचा प्रारंभ 1 जुलै रोजी कार्ला येथून करण्यात आला. केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार जयंत पाटील, आमदार सुनील तटकरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे, आमदार सुभाष पाटील, आमदार सुरेश लाड, आमदार भरत गोगावले, आमदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर यांपैकी एकही लोकप्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित राहिला नाही. सर्वांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. लोकप्रतिनिधींच्या गैरहजेरीत या अभियानाची जिल्ह्यातील सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आली.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, उपवनसंरक्षक मनीष कुमार, उपजिल्हाधिकारी रोहयो विश्वनाथ वेटकोळी, तहसीलदार प्रकाश संकपाळ, जयेश पाटील, सागर जंगम, रोहिणी संतोष पाटील, विलास पाटील, मोनिका म्हात्रे आदी स्थानिक झिरड, नेऊली व वाडगाव येथील सरपंच, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी ए. एस. निकत यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी उपस्थितांना वृक्ष प्रतिज्ञा दिली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत रोप देऊन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करून वृक्षलागवड अभियानाची सुरुवात करण्यात आली.

COMMENTS