अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी, संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा शिवसेनेचा इशारा !

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी, संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा शिवसेनेचा इशारा !

मुंबई – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली असल्याचं दिसत आहे. कबुल केलेला संपूर्ण निधी न दिल्यामुळे शिवसेना आमदार आणि मंत्री आज आक्रमक झाले असल्याचं पहावयास मिळालं आहे. मतदारसंघातील विकास कामांसाठी कबुल केलेला 10 कोटींचा निधी देण्याची मागणी शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीवरुन आज शिवसेना आमदार आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात ठिय्या मांडला होता. अडीच तास वाट बघितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ३ मिनिटात शिवसेना मंत्री आमदारांबरोबरची बैठक संपवली आहे.

दरम्यान निधी देण्याबाबत ठोस आश्वासन मिळाले नाही तर कामकाजात सहभागी न होण्याची भूमिका शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांनी घेतली आहे. तसेच निधी देण्यात मुख्यमंत्री दुजाभाव करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला असून वर्षभर पाठपुरावा करूनही आणि आश्वासन देऊनही निधी मिळत नसल्याने शिवसेना आमदार संतप्त झाले असल्याचं पहावयास मिळालं आहे.

दरम्यान तीन मिनिटांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमदारांची आश्वासनावर बोळवण केली असल्याचं दिसत आहे.  शिवसेनेच्या शहरी भागातील आमदारांना पाच कोटी आणि ग्रामीण भागातील आमदारांना 3 कोटींचा निधी दिल्याचा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला आहे. परंतु आम्हाला निधी मिळाला नसल्याचं शिवसेना आमदारांनी म्हटलं आहे. तसेच निधीबाबत दोन दिवसात बैठक घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर शिवसेनेचे आमदार आणि मंत्री शांत झाले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार निधीवरून मुख्यमंत्री आणि शिवसेना आमदारांमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे विरोधक आणि मित्रपक्षांतील आमदारांचा सामना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावा लागणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS