राज ठाकरेंच्या पनवेल दौ-यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, अनेक तरुणांचा मनसेत प्रवेश !

राज ठाकरेंच्या पनवेल दौ-यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, अनेक तरुणांचा मनसेत प्रवेश !

पनवेल – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून मनसे कार्यकर्ते कामाला लागल्याचे पहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत महिन्याची जिल्हा कार्यकारिणीची बैठक खारघर येथे रविवारी (1 जुलै) पार पडली. या बैठकीत रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलमधील विविध प्रश्‍नांवर अधिक फोकस करण्यात आला. पनवेल महापालिकेतील सत्ताधार्‍यांच्या निष्क्रीयतेचा पाढा या बैठकीत वाचण्यात आला.

दरम्यान पनवेल महापालिका हद्दीतील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त झाले असून विजेचा प्रश्‍न, अनियमित होणारा पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, तसेच प्लॅस्टिक बंदीमुळे दुकानदारांना भेडसावणार्‍या समस्या या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी लवकरात लवकर या समस्यांवर मनसेतर्फे आक्रमक भूमिका घेतली जाईल, असे सांगितले. या बैठकीत पनवेल तालुका क्षेत्रातील विभागांवर पदाधिकारी नेमण्यात आले. या वेळी अनेक तरुणांनी राज ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास ठेवून मनसेमध्ये प्रवेश केला.

या बैठकीला रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण, जिल्हा चिटणीस केसरी पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ, मनविसे रायगड जिल्हाध्यक्ष अक्षय काशीद, प्रथमेश सोमण, केदार सोमण, प्रतीक वैद्य, यतीन देशमुख, रोहित दुधवडकर, गणेश बनकर, जयंत सकपाळ, संतोष पंडित, मांडवकर ताई, संजय पाल यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

 

COMMENTS