काँग्रेस-राष्ट्रवादी, राजू शेट्टींमधील जागावाटपाचं गु-हाळ सुरुच, ‘या’ जागांसाठी शेट्टींची प्रतिष्ठा पणाला !

काँग्रेस-राष्ट्रवादी, राजू शेट्टींमधील जागावाटपाचं गु-हाळ सुरुच, ‘या’ जागांसाठी शेट्टींची प्रतिष्ठा पणाला !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीमधील जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. दोन्ही पक्षांनी  24-24 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मित्रपक्षांमधील जागावाटपाचं गु-हाळ मात्र अजून सुरु असल्याचं दिसत आहे. कारण राजू शेट्टी यांना हव्या असलेल्या जागा सोडण्यास काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते अद्यापही तयार नाहीत.

राजू शेट्टी यांनी सात जागा मागितल्या होत्या परंतु किमान दोन–तीन जागा मिळू शकतील, अशी अपेक्षा त्यांना आहे. परंतु काँग्रेस – राष्ट्रवादीचे नेते मात्र  राजू शेट्टी यांना केवळ एकच जागा देण्यास तयार असल्याचे माहिती आहे. त्यामुळे राजू शेट्टींसोबतच्या चर्चेचं गु-हाळ अजून सुरुच असल्याचं दिसत आहे.

दरम्यान हातकणंगले, वर्धा व बुलढाणा या तीन जागा लढवण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. शिवसेनेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आलेल्या सुबोध मोहिते यांच्यासाठी वर्धा व रविकांत तुपकर यांच्यासाठी बुलढाणा या जागांसाठी शेट्टी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

परंतु खासदार शेट्टींचा मतदारसंघ असलेल्या हातकणंगलेची एकमेकव जागा देण्यास काँग्रेस – राष्ट्रवादीचे नेते तयार आहेत. त्यामुळे आता राजू शेट्टी यांची समजूत काढणं काँग्रेस-राष्ट्रवादीला कठीण जाणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS