काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील डाव्या लोकशाही आघाडीची महत्त्वाची बैठक !

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील डाव्या लोकशाही आघाडीची महत्त्वाची बैठक !

मुंबई – काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीतील डाव्या लोकशाही आघाडीनं आज महत्त्वाची बैठक घेतली आहे. शेकापचे जयंत पाटील, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, सपाचे अबू आझमी, प्रहार संघटनेचे बच्चू कडू, अशोक ढवळे, प्रकाश रेड्डी, बी. जी. कोळसे पाटील, लोकभारतीचे कपिल पाटील आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत.

आघाडीत काँगेस, राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी 125 जागा आल्या आहेत, उर्वरित 38 जागा या घटक पक्षांना सोडण्यात आल्या आहेत . या 38 जागा कुणी कशा वाटून घ्याव्या याबाबत चर्चा सुरु आहे. काही जागांची अदलाबदल करायची असेल तर आघाडीमध्ये पुन्हा चर्चा होणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतातील सरकार पाच वर्ष चालवले असल्याचं माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच सहयोगी शिवसेनेला ते बरोबरचा मानत देत नाहीत हे दिसत आहे. शिवसेनेबाबत काय भूमिका आहे हे त्यांनी दाखवून दिलंय. मेगा भरतीत जे गेले ते या काळात सरकारला मदत करत होते. शेतकऱ्यांसाठी बरंच काही केलं असा दावा मोदी करतात. मग शेतकरी आत्महत्या का वाढल्या, शेतीचा विकास दर खाली आला, शेतमालाचे भाव खाली का आले याचे उत्तर मोदी यांनी द्यावे. पाकिस्तानातून साखर आयात केली, मागील आठवड्यात कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला ते इम्रान खानचे हात मजबूत करण्यासाठी घेतला होता का? असा सवालही शेट्टी यांनी केला आहे.

दरम्यान आमदार बच्चू कडू यांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानचा कांदा आणणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात मोदी म्हणाले होते मी नंदुरबार,नाशिकचा कांदा खाल्ला आहे, इथल्या कांदा उत्पादकांशी बेईमानी करणार नाही. मात्र त्यांनीच पाकिस्तानातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला, ही नमकहरामी नाही का? असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच 370 आणि काश्मीर वर मतदान होणार असेल तर कांद्यावर, शेतमालाच्या कोसळलेल्या भावावर मतदान झालं पाहिजे असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

COMMENTS