राजू शेट्टी आणि त्यांचे कट्टर राजकीय शत्रू उद्या एकाच व्यासपीठावर !

राजू शेट्टी आणि त्यांचे कट्टर राजकीय शत्रू उद्या एकाच व्यासपीठावर !

सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि त्यांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जयंत पाटील हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. रविवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघंही एकाच व्यासपीठावर येत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरणात जोरदार चर्चा सुरु आहे. बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून या दोन नेत्यांमधील दुरावा कमी होत असून ते  एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आ. जयंत पाटील यांचा वाळवा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाच्या समावेशामुळे तसेच साखर कारखानदारीवरून पाटील आणि शेट्टी यांच्यात वाद आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीपासून ते गेल्या वर्षी इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीपर्यंत या दोन नेत्यांमधील संघर्ष जनतेस पाहण्यास मिळाला होता. आ. पाटील विरोधक एकत्र करून त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न खा. शेट्टी यांनी केला होता. यातूनच इस्लामपूर नगरपालिकेत सत्ताबदलही घडवून आणला आहे. परंतु हा सर्व वाद विसरुन हे नेते एकत्रित येणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

 

COMMENTS