खबरदार नामांतर केलं तर रस्त्यावर उतरणार

खबरदार नामांतर केलं तर रस्त्यावर उतरणार

औरंगाबाद : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवसेना, भाजप व मनसेसह काही पक्षांनी नामांतराची मागणी केली आहे. काॅंग्रेसपाठोपाठ आता रिपाईंचे नेते रामदास आठवले यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारने शहराचे नाव बदलल्यास रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.

औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करावे, अशी मागणी शिवसेना अनेक वर्षांपासून करीत आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसेसवर ‘संभाजीनगर’ असे फलकही लावले होते. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काँग्रेसने नामांतराला विरोध केला आहे. ही संधी साधून विरोधी पक्ष भाजपने ही मागणी रेटून धरली आहे. दरम्यान भाजपचा घटक पक्ष असलेल्या रिपाईने यास विरोध केला आहे. ‘औरंगाबादचं नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील,’ असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

COMMENTS