अहो, राणा पाटील साहेब,  तुमचं हे असलं कसलं दैवत ?

अहो, राणा पाटील साहेब,  तुमचं हे असलं कसलं दैवत ?

उस्मानाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी काल अखेर राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. तसंच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचंही जाहीर केलं, कदाचित आजच ते सोलापूरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राणा जगजितसिंह पाटील यांच्या या घोषणेमुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात निर्माण झालेला राजकीय सस्पेन्स अखेर संपला.

काल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस का सोडत आहोत ? आणि भाजपमध्ये का प्रवेश करत आहोत ? याची कारणे सांगितली. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण भाजपची वाट धरली. जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही असंही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस सोडतोय हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. शरद पवार हे आपलं दैवत होतं, आहे आणि राहील असंही सांगितलं.

भाजपमध्ये प्रवेश कऱण्याची जी कारणे त्यांनी सांगितली आणि पवार हे आपलं दैवत आहेत असं सांगितलं त्यावरुन काही प्रश्न निर्माण होत आहेत. पहिला प्रश्न 2014 च्या आधी तब्बल 15 वर्ष तुमच्या पक्षाची राज्यात सत्ता होती. त्यातला काही काळ तुम्ही मंत्रीही होता. मग त्या काळात हे प्रश्न सोडवण्यात तुम्हाला यश का आलं नाही ? त्यावेळी तुम्हाला पक्षातून मदत झाली नाही का ? तुम्हाला मदत झालीच नव्हती तर मग त्यावेळेसच तुम्ही पक्ष का सोडला नाही ? त्यामुळे विकासासाठी भाजपमध्ये जातोय असं तुम्ही म्हणत असाल तर 15 वर्ष सत्ता असताना विकास केला नाही मग आता पुढे निवडूण आल्यावर काय वेगळा विकास करणार आहात असं प्रश्न मतदारांनी विचारला तर ?

दुसरी गोष्ट दैवताची. शरद पवार आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांचे राजकीय संबध काय होते हे जिल्ह्यालाच नव्हे तर अख्या महाराष्ट्राला माहित आहे. शरद पवरांनी डॉ पाटलांना भरभरुन दिलं आणि तेवढीच तोलामोलाची साथ डॉ. पाटील यांनी पवारांना दिली. शरद पवारांसाठी सुधाकर नाईकांवर धावून जाणारे डॉ. पद्मसिंह पाटीलच होते. शरद पवारांनी सांगितलं तर कोरड्या विहिरीतही डॉ. पाटील उडी मारायला कमी करणार नाहीत अंस त्याकाळी बोललं जायंचं. ते खरंही होतं. त्याला निष्ठा म्हणतात. पण एकीकडे पवार माझे दैवत आहेत असं म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच दैवताचा पडता काळ असताना त्याला सोडून जायचं ? हे असलं कसलं दैवत असा प्रश्न पडतोय ?

COMMENTS