राणे – अमित शहा – मुख्यमंत्री यांच्यात दिल्लीत मध्यरात्री तासभर खलबतं, राणेंना काय मिळाली ऑफर ?

राणे – अमित शहा – मुख्यमंत्री यांच्यात दिल्लीत मध्यरात्री तासभर खलबतं, राणेंना काय मिळाली ऑफर ?

दिल्ली –  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी बुधवारी मध्यरात्री दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. गेली अनेक दिवस राणेंचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा आहे. मात्र आजपर्य़ंत तो होऊ शकला नाही. त्यामुळे राणे कमालीचे नाराज झाले होते. आपण फार काळ वाट पाहणा-यांपैकी नाही असंही त्यांनी सांगितलं होतं. त्याची दखल घेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे आणि अमित शहा यांची भेट घडवून आणली. मात्र राणेंना राज्य मंत्रीमंडळातील समावेशाऐवजी राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राणेंच्या राज्यमंत्रिमंडळातल्या समावेशाला मुख्यमंत्रीच तयार नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याचबरोबर शिवसेनेचाही राणेंना मंत्रिमंडळात घेण्यास विरोध आहे. राणेंना मंत्रिमंडळात घेतल्यास बाहेर पडण्याची धमकी शिवसेनेनं दिल्याचीही चर्चा आहे. तसंच राणेंना मंत्रिमंडळात समावेश केल्यास ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हेही नाराज होतील अशी भीती भाजपला आहे. त्यामुळेच त्यांना मंत्रिमंडळात घेण्याऐवजी राज्यसभेत पाठवण्याची ऑफर भाजपनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी नुकतीच निवडणूक जाहीर झाली आहे. सध्याच्या आमदारांच्या संख्येवरुन भाजपचे तीन उमेदवार निश्चितपणे निवडूण येऊ शकतात. त्यातील एक जागा राणेंना दिली जाऊ शकते. यावर आता राणे काय भूमिका घेतात ते पहावं लागेल.

COMMENTS