त्याठिकाणी शिवसेना-काँग्रेस युतीबाबत अविश्वास ठराव आणा, शिवसेनेची हमी मी घेतो – दानवे

त्याठिकाणी शिवसेना-काँग्रेस युतीबाबत अविश्वास ठराव आणा, शिवसेनेची हमी मी घेतो – दानवे

औरंगाबाद – विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. या मतदारसंघासाठी १९ ऑगस्ट रोजी मतदान, तर २२ ऑगस्ट रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना आणि औरंगाबाद येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद जि. प. तील सत्ताकारणावरून आक्रमक झालेल्या भाजप सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेतील शिवसेना-काँग्रेस युतीबाबत अविश्वास ठराव आणा, शिवसेनेची हमी मी घेतो, असं आश्वासन यावेळी दानवे यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान राज्यमंत्री दानवे यांनी रविवारी जालना, औरंगाबाद येथे दोन बैठका घेतल्या. या बैठकीत जिल्हा परिषदेत विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपच्या सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शिवसेनेने जाणीवपूर्वक भाजप सदस्यांना विकास निधी न दिल्याने आमच्या गटांमध्ये विकासकामे झाली नाहीत. याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत असल्याचे मत भाजप सदस्यांनी मांडले.  या बैठकीला म.वि.म.चे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, आ. प्रशांत बंब, शिवसेना संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्यासह भाजपचे जिल्ह्यातील सर्व नगरसेवक, जि. प. सदस्य आणि पंचायत समिती सभापती हजर होते.

COMMENTS