दानवेंना केंद्रात मंत्रीपद, प्रदेशाध्यक्षपदासाठी ‘या’ नावांची चर्चा !

दानवेंना केंद्रात मंत्रीपद, प्रदेशाध्यक्षपदासाठी ‘या’ नावांची चर्चा !

मुंबई – नरेंद्र मोदी आज पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत. मोदी यांच्या शपथविधीला आता अवघे काही तास उरले आहेत. नरेंद्र मोदी हे आज संध्याकाळी सात वाजता पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. त्यांच्यासोबत इतर नेतेही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये काही नवीन चेह-यांनाही संधी देण्यात येणार आहे. या नवीन चेह-यांपैकी राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं नाव देखील निश्चित झालं आहे. दानवे केंद्रात गेले तर त्यांच्याठिकाणी प्रदेशाध्यक्ष कोण असणार याबाबत चर्चा रंगली आहे. यामध्ये संभाजी पाटील निलंगेकर, सुजितसिंह ठाकूर तर गिरीश महाजन यांचं नाव चर्चेत आहे.

दरम्यान राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष
रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात भाजपला मोठा विजय मिळाला आहे. 2014 आणि 2019 मधील लोकसभेत भाजपनं राज्यात मोठं यश संपादन केलं आहे.तसेच जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाचवा विजय मिळवत रावसाहेब दानवे यांनी रेकॉर्ड केला आहे. अडीच लाखाहून अधिक मताधिक्‍य मिळवत काँग्रेसच्या विजय औताडे यांचा पराभव करत दानवे यांनी आपली जागा राखली. दानवे हे राज्यातील मराठा चेहरा असल्यामुळे त्यांना भाजपकडून मंत्रीपद दिलं जाणार आहे.
त्यामुळे दानवे आता केंद्रात गेले तर त्यांच्याठिकाणी प्रदेशाध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा रंगली आहे. यामध्ये भाजपचे नेते आणि लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार सुजितसिंह ठाकूर आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे या तिघांपैकी प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागलं आहे.

तसेच केंद्रीय भूपृष्ठ, जलवाहतूक आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे असलेली तीच खाती कायम ठेवली जाणार असल्याची माहिती मिळत असून प्रकाश जावडेकर आणि पराभूत होऊनही हंसराज अहिर यांना मंत्रीपद मिळणार आहे. तर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे देखील खाते कायम ठेवले जाणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS