मोदी हटावसाठी मुंबईत खलबतं, सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी !

मोदी हटावसाठी मुंबईत खलबतं, सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजेच पर्यायानं भाजपचा पराभव करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रमंच या व्यासपीठाची दुसरी बैठक आज मुंबईत पार पडली आहे. दादर येथे झालेल्या बैठकीला राजकारण, समाजकारण, कायदा, सामाजिक संस्था, पत्रकारितासह ग्लॅमर क्षेत्रातील 40 नामवंत व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. मोदी मुक्त भारत हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवत देशातील न्यायव्यवस्था, संविधान आणि लोकशाहीचे स्वातंत्र्य अबाधित राखणं यादृष्टीने या बैठकीत महत्त्वाची चर्चा करण्यात आली. देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपमध्ये मोदी-शाह यांच्याविरोधात उघड बंड पुकारलेल्या यशवंत सिन्हा यांनी या बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषविले.

तसेच येत्या 1 मेला राष्ट्रमंचच्या माध्यमातून पुरोगामीत्व मोर्चा कोल्हापूरमध्ये काढण्यात येणार आहे.तर 7 मेला अकोल्यात शेतकरी सभा आणि त्यानंतर काही दिवसात मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात जाहीर सभेचं आयोजन राष्ट्रमंच व्यासपीठ करणार आहे. आज झालेल्या बैठकीत मुंबईतील पदाधिका-यांची कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून मोदी-शाह यांच्या पराभवासाठी सर्व संघटना तसेच राजकीय पक्षांनी आपले मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येण्याचं आवाहन बैठकीत उपस्थित असलेल्या मान्यवरांनी केलं आहे.

दरम्यान यावेळी यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. CBSE घोटाळ्यामुळे देशातील मुलांचं भविष्य धोक्यात आलं असून देशातील मीडियावर दबाव आणला जात आहे. तसेच न्यायव्यवस्थे दोन तुकडे करण्यात आले असून सुप्रीम कोर्टाला ताब्यात घेण्यासाठी गैरव्यवहार केला जात असल्याचा आरोप सिन्हा यांनी यावेली केला आहे. त्यामुळे या समितीद्वारे जनजागृती करुन देशामध्ये बदल घडवून आणला जाणार असल्याचंही सिन्हा यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS